गोंदियात नागरिकांची गांधीगिरी; अभियंता व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांची केली पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 08:05 PM2023-06-22T20:05:58+5:302023-06-22T20:06:21+5:30
Gondia News सिव्हिल लाइन्सवासीयांनी गुरुवारी (दि.२२) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता, तसेच कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला हार घालून, तसेच अगरबत्तीने ओवाळून पूजा करीत गांधीगिरीतून आपला रोष व्यक्त केला.
गोंदिया : सिव्हिल लाइन्स परिसरातील हनुमान चौकात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यावरून पडल्याने तरुणाचा हात मोडला. यामुळे संतप्त झालेल्या सिव्हिल लाइन्सवासीयांनी गुरुवारी (दि.२२) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता, तसेच कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला हार घालून, तसेच अगरबत्तीने ओवाळून पूजा करीत गांधीगिरीतून आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनाची शहरात एकच चर्चा सुरू होती.
शहरात भूमिगत गटार योजनेचे काम मागील वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू आहे. अत्यंत निकृष्ट व निष्काळजीपणाने हे काम सुरू असून, या कामामुळे शहरवासीयांचा जीवच धोक्यात आला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, या योजनेच्या कामावरच रस्ता खोदकाम करताना मजुराचा मातीखाली दबून मध्यंतरी मृत्यू झाला. याशिवाय इतरही अपघाताच्या कित्येक घटना घडल्या आहेत. मात्र, त्यानंतरही कंत्राटदार कंपनीकडून, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कंपनीला काहीच सूचना दिल्या जात नसल्याने अत्यंत निकृष्ट व निष्काळजीपणे काम सुरू आहे.
सध्या सिव्हिल लाइन्स हनुमान मंदिर चौकात गटार योजनेचे काम सुरू असून, त्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे, असे असूनही तेथे बेरिकेडस लावण्यात आलेले नसल्याने बुधवारी (दि.२१) रात्री १०:३० वाजेदरम्यान मोटारसायकलस्वार अंकुश अग्रवाल व नितेश लिल्हारे हे दोघे तरुण पडले. यामध्ये अंकुशचा हात मोडला असून, नितेशलाही मार लागला आहे. वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे संपातलेल्या सिव्हिल लाइन्स परिसरातील तरुणांनी गुरुवारी (दि.२२) दुपारी मजिप्र अभियंता बागडे व कंत्राटदाराच्या कंपनीचा कर्मचारी प्रशांत धानस्कर यांना बोलाविले. मात्र, बराच वेळ ते आले नाहीत. अशात पोलिसांना बोलावून त्यांना बोलाविले असता ते आल्यावर संतप्त तरुणांनी त्यांना हार घातला, तसेच अगरबत्तीने त्यांना ओवाळून पूजा केली व पेढे खाऊ घालत गांधीगिरी केली. या गांधीगिरी आंदोलनात बाबा बागडे, सोहेल शेख, नितीन जैन, विशाल गलानी, राहुल खोटेले, सोनू शेवते, हर्ष कावडे, मधुरिम श्रीवास, सागर कदम, संचय चौरसिया, प्रथम कोडवानी, राजा गिऱ्हे यांच्यासह परिसरातील नागरिकांचा समावेश होता.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- हनुमान मंदिरासमोर अत्यंत निष्काळजीपणे सुरू असलेल्या या कामाला घेऊन मंदिरातील पंडित सुरेंद्र शर्मा यांच्यासह त्या परिसरातील रहिवासी व व्यापारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शिवाय एका मजुराचा जीव गेला असून, अपघातात कित्येक जण जखमी झाले आहेत. यानंतरही कंपनीकडून, तसेच मजिप्राकडून कोणतेही गांभीर्य दाखविले जात नसल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत.