बाल मजुरांना फूस लावून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा ‘पर्दाफाश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:28 PM2018-05-28T13:28:36+5:302018-05-28T13:28:47+5:30
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून छत्तीसगडच्या रायपूर येथे बाल मजुरांना नेणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश’ गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा बलाने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: कमी पैसे देवून अधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने बाल मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेले जात आहे. यासाठी मोठी टोळी तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून छत्तीसगडच्या रायपूर येथे बाल मजुरांना नेणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश’ गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा बलाने केला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा बल नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे व सहायक सुरक्षा आयुक्त ए.के. स्वामी यांच्या मार्गदर्शनात, पोस्ट प्रभारी किरण एस. व गोंदियाचे सीबीआय निरीक्षक एस. दत्ता यांच्या मार्गदर्शनात स्पेशल टास्क टीम गोंदियाचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम, उपनिरीक्षक एस.एस.बघेल व जी.आर. मडावी, आर. सी. कटरे, आरक्षक पी.एल. पटेल, आर.एस.के. वरकडे हे शनिवारी (दि.२५) दुपारी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर नजर ठेवून होते. दरम्यान दुपारी त्यांना दोन अल्पवयीन मुले घाबरलेल्या स्थितीत भटकताना आढळले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी आपले नाव अक्षय जगत धुर्वे (१३) व आकाश बालकराम मडावी (१५) दोन्ही रा. सेघाट ता. वरूड जि. अमरावती असे सांगितले. दोघांची कसून चौकशी करुन गोंदियाला येण्याबाबत विचारल्यावर त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यामुळे दोघांवर नजर ठेवण्यात आली. त्यांच्यासोबत पुन्हा दोन जण असून ते आपल्या इतर साथीदारांचा शोध घेत असल्याचे आढळले. काही वेळानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर त्यांचे आठ इतर सोबती आढळले. त्यांच्यावर पुन्हा नजर ठेवण्यात आली. काही वेळानंतर एक तरुण त्यांना प्रलोभन देवून दुसऱ्या ठिकाणी घेवून जाण्यासाठी गाडीची वाट पहात असल्याचे आढळले. एकूण १० अल्पवयीन मुलांना घाबरलेल्या स्थितीत पाहताच उपनिरीक्षक विवेक मेश्राम, एस.एस. बघेल यांना बाल तस्करीचा संशय आला. टीमद्वारे सर्व अल्पवयीन व त्यांना सोबत नेणाऱ्या एका तरुणासह रेल्वे सुरक्षा बलाने सोबत आणले. यानंतर त्यांची चौकशी केली. त्यांनी विविध उत्तरे दिली व आपापले नाव व पत्ता सांगितला. याबाबत त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा माहिती नसल्याचे सांगितले. कुठे जात आहेत, कशासाठी जात आहेत, याचीसुद्धा त्यांना माहिती नव्हती. सर्व उपाशी व तहानलेल्या मुलांना जेवण देवून नजर ठेवण्यात आली. प्रकरण बाल मजुरीशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपी पंकजसह ठेकेदार व पिंटू कोरडे यांना घेवून ट्रेनने २६ मे २०१८ रोजी सकाळी ६ वाजता रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात आणण्यात आले. सर्व अल्पवयीनांचे चाईल्ड ट्रेफेकिंगचा प्रकरण असल्यामुळे सर्वांच्या कुटुंबीयांना सूचना देण्यात आली. बाल मजुरीसाठी नेणाऱ्या आरोपी पंकज व बोलाविणारा पिंटू कोरडे व ठेकेदार कुलदीपसिंह राजपूत हे आरोपी आढळल्याने गोंदियाच्या शासकीय रूग्णालयात त्यांचे आरोग्य परीक्षण करून कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी गोंदियाच्या सुपूर्द करण्यात आले.
असा अडकला मुख्य आरोपी
पोलीस स्टेशन प्रभारी व सीबीआय निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सांगण्यात आलेल्या पिंटू कोरडे नावाच्या व्यक्तीची माहिती घेण्यात आली.त्याला पकडण्यासाठी उपनिरीक्षक विवेक मेश्राम, यांच्या नेतृत्वातील चमूने आरोपी पंकज मलवे यांला घेऊन रायपूरला रवाना झाले. तेथे योजनाबद्ध पद्धतीने पिंटू कोरडे याला रेल्वे स्थानकावर बाल मजुरांना घेण्यासाठी पंकजद्वारे फोन करून बोलविले. तो बाल मजुरांना घेण्यासाठी रायपूर स्थानकावर पोहोचला. त्यावेळी त्याला टीमने पकडले.
बाल मजुरांचा कॅटरिंग व्यवसायाठी वापर
पिंटू कोरडे वल्द पारनया कोरडे (१९) रा. पुनर्वसन पुसरा, याची बाल मजुरांविषयी चौकशी केल्यावर, तो कुलदीपसिंह राजपूत कंत्राटदारासाठी मजूर घेऊन जातो. त्यात त्याला प्रतिमजूर ५० रूपये अधिक लाभ ठेकेदाराकडून मिळत असल्याचे सांगितले. निलम कॅटरर्स रायपूरसाठी तो काम करतो. बाल मजुरांचा उपयोग कॅटरिंग कामासाठी कमी मजुरीमध्ये करून घेतो.
बाल मजुरांमार्फत अधिक लाभ मिळवून घेण्यासाठी ९ बाल मजुरांना कॅटरिंग कामासाठी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात पाठविले जाते.
जीआरपी गोंदियाचे प्रभारी डी.एम. नाल्हाट यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनात त्या एका तरुणाची चौकशी करण्यात आली. पंकज मलवे वल्द भीमराव मलवे (२७) रा. पुसला, पुनर्वसन रेल्वे स्टेशनजवळ ठाणे शेघाट जि. अमरावती असे नाव असल्याचे सांगितले. तो वरूड तालुक्याच्या अमरावती जिल्ह्यातील विविध गावांतून अल्पवयीन बालकांना बाल मजुरीसाठी एकत्र करून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे घेवून जात होता. त्यासाठी त्याला प्रतिव्यक्ती ५० रूपये मिळणार असल्याचे सांगितले.या रायपूर येथे बोलाविण्यात आल्याचे त्याने सांगितले.