गाढवी नदी व नाल्यांचा पूर ओसरला

By Admin | Published: July 17, 2017 01:15 AM2017-07-17T01:15:56+5:302017-07-17T01:15:56+5:30

शनिवारी केशोरी परिसरात झालेल्या मूसळधार पावसामुळे गाढवी नदीला पूर आल्याने चिचोली येथील महेंद्र तुळशीराम लांडगे

Ganga river and drainage flood | गाढवी नदी व नाल्यांचा पूर ओसरला

गाढवी नदी व नाल्यांचा पूर ओसरला

googlenewsNext

जनजीवन पूर्वपदावर : ‘त्या’ इसमाचा मृतदेह सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : शनिवारी केशोरी परिसरात झालेल्या मूसळधार पावसामुळे गाढवी नदीला पूर आल्याने चिचोली येथील महेंद्र तुळशीराम लांडगे (४०) हा इसम पुरात वाहून गेला. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकामार्फत मृतदेहाची शोधमोहीम सुरू असताना रविवारी सकाळी ८ वाजता घटनास्थळावरून सुमारे १०० मीटर अंतरावर मृतदेह आढळला. महेंद्रच्या अकाली निधनाने चिचोली गावात शोककळा पसरली आहे. तर गाढवी नदी व परिसरातील नाल्यांचा पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
शनिवारी केशोरी परिसरात निसर्गाचा कोप झाला. अवघ्या चार तासांत २६५ मिमी पाऊस पडला. पावसाच्या कहराने गाढवी नदीने रौद्र रूप धारण केले. एरवी केवळ इटयाडोह धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे ओसंडून वाहणारी गाढवी नदी पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे दुथडी वाहू लागली. परिसरातील शेतात सर्वत्र पाणी जमा झाले. शेतातून नदी-नाल्यासारखा प्रवाह वाहू लागला. जरूघाटा गावातील घराघरांत पाणी घुसले. जरूघाटावासीयांनी पहाटे ४ वाजतापासून समाजमंदिरात गोळा होवून वेळ काढला. त्यांच्या मनात केवळ दहशत होती. जरूघाटा गावात कधीच एवढे पुराचे पाणी येत नाही. मात्र हा प्रकोप पहिल्यांदाच घडल्याचे जाणकार सांगतात. केवळ १० ते १२ किमीच्या अंतरात एवढा पावसाचा प्रकोप कसा, हा उलगडा अद्यापही जरूघाटा व परिसरातील जनतेच्या मनात घर करून आहे.
प्रतापगड व गोठणगाव डोंगरमाथ्यावर अतिवृष्टी झाली. डोंगरमाथ्यावरून प्रचंड वेगाने हे पाणी खाली उतरले. सोबतच डोंगरावरील दगडधोंडे वेगाने पाण्याच्या प्रवाहासोबत उतरल्याने प्रतापगडच्या आसपास रस्त्यावर दगडधोंडे दिसून येत आहेत. डोंगरावरून पाणी अतिवेगाने गाढवी नदी व चिचोलीच्या दिशेने आल्याने एकाएकीच पूर आल्याचे बोलले जात आहे. या अतितीव्र पाण्याच्या प्रवाहात महेंद्र वाहून गेला. तो शनिवारी सकाळी केशोरीला गेला तेव्हा नदी व नजीकच्या परिसरात पाणी नव्हते. मात्र तो जेव्हा परतला तेव्हा चहुकडे पाणीच पाणी होते. बाहेर निघता येईना. महेंद्र वाहून जात असताना इतर तिघे सावध झाले. त्यांनी बचावासाठी गाढवी नदीवरील उंचवठ्यावर सुरक्षेच्या दृष्टीने राहणे पसंत केले. याची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली. लगेच आपत्ती व्यवस्थापन पथक चिचोली गावाला रवाना करण्यात आले. त्यावेळी तिघे जण पसरलेल्या पाण्याच्या उंचवठ्यावर मदतीची प्रतीक्षा करीत होते. बचाव पथकाने सुमारे पाच फूट पाण्यात उतरून पुरात अडकलेल्या तिघांपर्यंत दोरखंड बांधले व या दोरखंडाच्या सहाय्याने तिघेही सुखरूप चिचोलीला परतले. वेळीच मदत मिळाली म्हणून तिघे बचावले. मात्र महेंद्र पूरबळी ठरला.
या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे इतर नाल्यांनासुद्धा पूर आला. त्यामुळे काही काळ जनजीवन प्रभावित झाले होते. मोरगाव ते निलज दरम्यानच्या नाल्यावर पाणी असल्याने महागाव ते अर्जुनी वाहतूक बंद होती. महागाव ते खामखुरा दरम्यानच्या नाल्यावर सुमारे पाच ते सहा फूट पाणी होते.

घर, गोठे, पशू व पिकांचे नुकसान
या अतिवृष्टीमुळे केशोरी व महागाव महसूल मंडळात घर, गोठे व पशुहानी झाली आहे. शिवाय धानपीक व बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे. तलाठ्यांनी घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. शेतपिकांच्या नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षण सुरू झालेले नाही. कृषी विभागाचे कर्मचारी व तलाठी मिळून येत्या एकदोन दिवसात संयुक्त सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती केशोरीचे मंडळ अधिकारी एल.यू. मेश्राम यांनी दिली. सर्वेक्षणानंतरच पीक नुकसानीची आकडेवारी कळेल. मांडोखाल येथील चार जनावरे घरी परतलेच नाही. अतिवृष्टीनंतर ते जंगलात भटकत आहेत की पुरात वाहून गेले, ते अद्यापही कळले नाही.

Web Title: Ganga river and drainage flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.