गंगाबाई रूग्णालयाचा गलथान कारभार उघड

By admin | Published: May 25, 2017 12:52 AM2017-05-25T00:52:10+5:302017-05-25T00:52:10+5:30

बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी २३ मे रोजी दुपारी ३ वाजता आकस्मिक भेट दिली.

Gangaabai Hospital's Gothan service is open | गंगाबाई रूग्णालयाचा गलथान कारभार उघड

गंगाबाई रूग्णालयाचा गलथान कारभार उघड

Next

१. पालकमंत्र्यांची आकस्मिक भेट २. रूग्ण व नातलगांनी मांडल्या समस्या ३. दोषींवर कारवाई होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी २३ मे रोजी दुपारी ३ वाजता आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान सदर रूग्णालयाचा गलथान कारभार उघड झाला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
गोंदियासह बालाघाट जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गरीब रु ग्ण महिला उपचार व बाळंतपणासाठी बाई गंगाबाई रूग्णालयात येतात. परंतु रूग्णांवर योग्य उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्याच्या तक्रारींची व मागील ४३ दिवसांत ३४ नवजात बालकांचा मृत्यू या रूग्णालयात झाल्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी हा आकस्मिक दौरा केला. तातडीने वैद्यकीय सेवेत १५ दिवसांच्या आत सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल यांना भ्रमणध्वनीवरु न पालकमंत्र्यांनी दिला.
पालकमंत्र्यांचे आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम आकस्मिक वैद्यकीय अधिकारी कक्षाला भेट देवून वैद्यकीय अधिकारी यांचा हजेरीपट बघितला. हजेरीपटाप्रमाणे उपस्थित अधिकाऱ्यांबाबत विचारणा करून गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश डॉ. दोडके यांना दिले. आकस्मिक विभागामध्ये जावून आकस्मिक ड्युटी अधिकारी डॉ. अंसारी, डॉ. खान व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. रश्मी प्रसाद उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. बाह्यरूग्ण विभागात दररोजचे रूग्ण तपासणी व आंतररूग्ण विभागात दररोज दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांची माहिती जाणून घेतली.
रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची पाहणी केली. रूग्ण व नातेवाईकांशी संवाद साधून पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबाबत विचारणा केली. थंड पाणी तर सोडाच पाणीसुध्दा बाहेरून आणावे लागत असल्याची तक्र ार रु ग्णाच्या एका नातेवाईकाने पालकमंत्र्याकडे या वेळी केली.
सोनोग्राफी कक्षाला भेट देवून लेबर रूम व आॅपरेशन थिएटरची पाहणी करून महिला रु ग्णांची पालकमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. नवजात शिशू कक्षाचे निरीक्षण केले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा हजेरीपट बघितला. नवजात शिशू कक्षात गंभीररित्या भरती असलेल्या शिशूंची चौकशी केली. रु ग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांचे गंभीर आजारी व कमी वजनाचे कमी दिवसाचे किती बालके भरती आहेत व त्यांच्यावर कशा पध्दतीने उपचार सुरु आहे, याबाबतची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.
मागील ४३ दिवसांत ३४ बालमृत्यूबाबत डॉ. दोडके यांच्याकडून सविस्तर आढावा घेतला. मृत्यू झालेल्या नवजात बालकांचा डेथ आॅडीट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दोडके यांना दिले. कमी दिवसाचे व कमी वजनाचे अर्थात कुपोषित बालके जन्माला येवू नये म्हणून विशेष प्रसूती तज्ज्ञांच्या सेवा ग्रामीण रूग्णालय पातळीवर उपलब्ध करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. प्रसूतीसाठी भरती असलेल्या महिलांची भेट घेवून त्यांच्या समस्या पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. योग्य ते औषधोपचार प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर करावे, असेही त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रु ग्णालये येथील आरोग्य सेवा व प्रसूती सेवा बळकटीकरणावर भर देवून बाई गंगाबाई रु ग्णालयातील रु ग्णभार कमी कसा करता येईल, याबाबत सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
बाई गंगाबाई रु ग्णालयात २०० रु ग्ण असताना ड्युटीवर केवळ एक वैद्यकीय अधिकारी हजर तर उर्विरत गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांना यावेळी जाब विचारणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास कार्यरत राहतील, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे तसेच आपल्या कर्तव्यात हयगय करणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी हे दर १५ दिवसांनी येथील व्यवस्थेबाबतचा आढावा घेतील. येथील व्यवस्थेबाबत तक्र ारी केल्या आहेत, त्याची निश्चित दखल घेण्यात येईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले, उपचारासाठी व बाळंतपणासाठी येणाऱ्या रु ग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सभ्यपणे वागावे. आलेला रूग्ण परत जाणार नाही, याची काळजी घेवून त्यावर योग्य ते औषधोपचार व शस्त्रक्रिया कराव्यात. येथील परिसरात असामाजिक तत्वांचा तसेच दलालांचा देखील वावर राहणार नाही, याची दक्षता घेवून रूग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची बाब लक्षात आल्यास संबंधित दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून
परिसराची पाहणी
पालकमंत्र्यांच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, बाई गंगाबाई महिला शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, सहायक अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, डॉ. सुवर्णा हुबेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले हे आकस्मिक भेटीवरून निघून गेल्यानंतर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ यांनी रूग्णालयाचा फेरफटका मारला. असामाजिक तत्वांचा रात्रीला मुक्त संचार रूग्णालयाच्या परिसरात असल्यामुळे रु ग्ण व नातेवाईकांच्या जीवाला धोका असल्याची माहिती डॉ. दोडके यांनी दिली. मुख्य प्रवेशद्वाराजवळ व समोर करण्यात आलेल्या अतिक्र मणाची पाहणी करून त्वरित अतिक्र मण हटविण्याबाबत संबंधितांना सूचना केली. पक्के बांधलेले अतिक्र मीत घर बुलडोजरने पाडण्याच्या सूचना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरु न जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. रूग्णालयाच्या परिसरात स्वच्छता कायम राहील यासाठी त्वरित पावले उचलून रूग्णालयाचा परिसर सुरक्षीत कसा राहील, यासाठी त्वरित सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Web Title: Gangaabai Hospital's Gothan service is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.