सराईत गुन्हेगारास केले जिल्ह्यातून हद्दपार, गंगाझर पोलिसांची कारवाई
By कपिल केकत | Published: February 16, 2024 08:21 PM2024-02-16T20:21:01+5:302024-02-16T20:21:26+5:30
सहा महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश
गोंदिया : विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी गंगाझरी पोलिसांनी केलेल्या कारवाईला यश आले असून,
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आदेश काढून या सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीकरिता हद्दपार केले आहे.
गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कोहका येथील रहिवासी सराईत गुन्हेगार आकाश सुशील कनसरे (२२) याच्याविरुद्ध गंगाझरी पोलिस ठाण्यात अवैध दारू विक्री, भांडण, मारहाण, दंगा करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, गृह अतिक्रमण, विनयभंग, धमकी देणे, अशाप्रकारचे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. आकाश कनसरेवर गंगाझरी पोलिसांनी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्याच्या चारित्र्य आणि सवयीत कसलीही सुधारणा झाली नाही. उलट तो मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होऊन त्याच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. अशात गंगाझरी पोलिस निरीक्षकांनी त्याला जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याकरिता महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१),(अ),(ब) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पर्वणी पाटील यांच्याकडे मंजुरीस्तव प्रस्ताव सादर केला होता.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांनी विहित मुदतीत प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून आकाश कनसरे या जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अखेर पाटील यांनी ९ फेब्रुवारी रोजी आदेश काढून आकाश कनसरे याला सहा महिन्यांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.
हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांत दहशत
- पोलिस अधीक्षक पिंगळे रुजू झाल्यापासून त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट हद्दपारीच्या कारवाया सुरू केल्या आहेत. यातूनच गंगाझरी पोलिसांनी आकाश कनसरेवर हद्दपारीची कारवाई करून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळवून दिला. पोलिसांकडून होत असलेल्या हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्य व अवैध धंद्यांपासून परावृत्त होऊन इतर वैध रोजगाराकडे वळावे अन्यथा हद्दपारीच्या कारवाया सुरूच राहतील, असे पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी कळविले आहे.