रायपूरवरून रेल्वेने गांजा आला, मालधक्क्यावर पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By नरेश रहिले | Published: March 10, 2024 04:18 PM2024-03-10T16:18:14+5:302024-03-10T16:18:32+5:30
१.२८ लाखांचा पाच किलो गांजा जप्त
गोंदिया : छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून गांजाची खेप घेऊन रेल्वेने शहरातील रामनगर परिसरात एक व्यक्ती येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेने रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील रेलटोली परिसरातील मालधक्का परिसरात सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. रॉबिन ऊर्फ दीपलाल चैनलाल पटलिया (४६, रा. हाऊस नं. २०, हाउसिंग बोर्ड कॉलनी, वाॅर्ड नं. ५१, सूरजनगर, लभादी, रायपूर-छत्तीसगड) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी महाशिवरात्री तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच गांजा बाळगणारे व विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथक तयार करण्यात आले आहेत. पथकाकडून अवैध व्यावसायिकांवर नजर ठेवली जात असतानाच हवालदार राजेंद्र मिश्रा यांना एक युवक गांजाची खेप घेऊन रामनगर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी (दि. ९) मालधक्का परिसरात सापळा लावून रॉबिन पटलिया याला रंगेहात पकडले.
५ किलो १४० ग्रॅम गांजा जप्त
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील रॉबिन पटलिया जांभळ्या रंगाच्या बॅगमध्ये सेलो टेपने गुडाळलेले २ बंडल, गुलाबी रंगाच्या बॅगमध्ये सेलो टेपने गुंडाळलेले ३ बंडल, असे एकूण ५ बंडल गांजा घेऊन मालधक्का परिसरात आला होता. पोलिसांनी त्याला पकडले व पॅकेट बघितले असता, त्यात हिरवी ओलसर पाने, फुले आणि बिया मिश्रित ५ किलो १४० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. त्या गांजाची किंमत एक लाख २८ हजार ६०० असून, पोलिसांनी गांजा जप्त केला आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक लबडे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार अर्जुन कावळे, हवालदार राजू मिश्रा, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, महेश मेहर, प्रकाश गायधने, विठ्ठल ठाकरे, दुर्गेश तिवारी, महिला शिपाई स्मिता तोंडरे यांनी ही कारवाई केली आहे.