२९,२४६ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन
By admin | Published: May 19, 2017 01:31 AM2017-05-19T01:31:50+5:302017-05-19T01:31:50+5:30
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत जिल्ह्यात १६ मे २०१७ पर्यंत ४७ हजार २२२ अर्ज गॅस कनेक्शन मिळण्यासाठी प्राप्त झाले.
४०,८०२ लाभार्थी पात्र : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत जिल्ह्यात १६ मे २०१७ पर्यंत ४७ हजार २२२ अर्ज गॅस कनेक्शन मिळण्यासाठी प्राप्त झाले. यापैकी ४० हजार ८०२ अर्ज गॅस कनेक्शन मिळण्यास पात्र आहेत. तर २९ हजार २४६ गॅस कनेक्शन लाभार्थ्यांना लावून देण्यात आले आहेत.
तसेच नवीन नोंदणी सुरू असून उर्वरित ११ हजार ५५६ कनेक्शन ३० जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के. सवई यांनी दिले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक एजन्सी, सर्व गॅस कंपन्यांचे विक्री अधिकारी व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सवई यांनी केले आहे.
मंगळवारी १६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के. सवई यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या गॅस कनेक्शनबाबत सर्व गॅस कंपन्यांचे विक्री अधिकारी व जिल्ह्यातील गॅस वितरक एजन्सी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यात एचपीसीचे विभागीय नोडल अधिकारी आदित्य टाक, सहायक पुरवठा अधिकारी सी.आर. भंडारी, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक एजन्सीधारक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने खासदार नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे १५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत योजनेच्या प्रभावकारी व परिणामात्मक अंमलबजावणीच्या दृष्टीने संबंधितांना कडक निर्देश दिले आहे. त्या निमित्तानेच सदर सभा घेण्यात आली. एचपीसीचे विभागीय नोडल अधिकारी आदित्य टाक यांनी उर्वरित कनेक्शची कार्यवाही ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही तथा त्यांचे नाव सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण यादीत नाही, त्यांनी स्वतंत्ररित्या संबंधित गॅस एजन्सीकडे अर्ज सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
योजनेचा लाभ कसा
व कोणाला?
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलेचे नाव यादीत आहे व ज्यांच्या नावे गॅस कनेक्शन नाही, अशा पात्र महिलांना गॅस जोडणी १०० रूपयांचे नोंदणी शुल्क भरून घेता येते. तसेच उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याची सुविधा आहे. यासाठी अशा पात्र महिलेच्या घरात सुरक्षिततेच्या दृष्टीने ४ बाय २ अकाराचा ओटा असणे आवश्यक आहे. येत्या महिन्यात उर्वरित सर्व पात्र महिलांंना सदर योजनेंतर्गत गॅसचे वितरण पूर्ण करण्यात येणार आहे.