गोंदियात गॅस सिलिंडरचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:18 PM2020-04-16T20:18:30+5:302020-04-16T20:18:59+5:30
घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस काढून तो मोकळ्या जागेत त्याचा काळाबाजार करणे सुरू होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी सदर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराच्या गणेशनगरातील अरविंद गॅस एजन्सी गणेशनगर यांच्या गॅस गोदामातून आणलेले सिलिंडर बसंतनगरातील अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सिलिंडरमधील गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथे धाड टाकून गुरूवारी (दि.१६) कारवाई केली.
घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस काढून तो मोकळ्या जागेत त्याचा काळाबाजार करणे सुरू होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी सदर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाड घालून निक्कू लिल्हारे रा.बसंतनगर हा एच.पी.गॅसच्या सिलिंडरमधून इलेक्ट्रीक मोटारच्या सहाय्याने गॅस काढून तो खाली सिलिंडरमध्ये भरत होता. या ठिकाणी अरविंद गॅस एजेंन्सीचे तीन वाहन पकडण्यात आले.एमएच ४६ डी.५८७२ यावर चालक विकेश सुरेश फुंडे रा.संजयनगर, आकाश गणेश शेंडे, रा.शास्त्री वॉर्ड गोंदिया, वाहन क्रमांक एमएच ३५ के. ४९५९ चा चालक राजू हिरालाल भोंगाडे रा. संजयनगर त्याचा मदतनिस राहूल यशवंत बागडे रा. संजयनगर, विनोद कारूदास बोरकर रा. गोरेगाव, वाहन एमएच ३५ एजे १२७३ चा चालक महेंद्र दुर्गाप्रसाद शिवणकर रा. गोंदेखारी, त्याचा मदतनिस राजू गोविंदा नेवारे रा.श्रीनगर गोंदिया, सोनू मेथीलाल सिंधीमेश्राम रा.मुंडीपार तसेच निकू लिल्हारे याचे कामगार प्रदीप शरद मेंढे, रा.छोटा गोंदिया, इंद्रकुमार नारंगीलाल नागपुरे रा. गणेशनगर गोंदिया या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत तीन वाहन, १२० सिलिंडर, दोन इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक मोटारला जोडलेले ४ रेग्यूलेटर पाईप, दोन वजन काटे असा एकूण १४ लाख ८१ हजार ४९६ रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, सुखदेव राऊत, विजय रहांगडाले, लिलेंद्र बैस, चंद्रकांत कर्पे, भूवनलाल देशमुख, भुमेश्वर जगनाडे, मधुकर कृपान, चित्तरंजन कोडापे, रेखलाल गौतम, विनोद गौतम यांनी केली आहे.
हिरडामालीच्या गोदामातून सिलिंडर आणल्याची माहिती
४पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची विचारपूस केली असता जप्त केलेले सिलिंडर अरविंद गॅस एजेंन्सी गणेशनगरचे गोदाम हिरडामाली येथे आहे. त्या गोदामातून हे सिलिंडर आणून बसंतनगरात काळाबाजार केला जात असल्याचे सांगितले. जिल्हा पुरवठा निरीक्षक वैभव तोंडे व स्थानिक गुन्हे शाखा ही कारवाई केली. अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळाबाजार करणाºयांची माहिती द्या
४जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुरविण्यात येणाºया अत्यावश्यक साहित्याचा कुणी काळाबाजार करीत असेल तर त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष यांना माहिती द्यावी असे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी म्हटले आहे.