सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:41 PM2018-11-05T21:41:58+5:302018-11-05T21:42:19+5:30
ऐन दिवाळीच्या तोंडावर गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरचा दर १०३४ रुपयांवर गेल्याने जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांना याचा फटका बसला आहे. तर वाढत्या दरामुळे गृहीणीचे बजेट बिघडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऐन दिवाळीच्या तोंडावर गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरचा दर १०३४ रुपयांवर गेल्याने जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांना याचा फटका बसला आहे. तर वाढत्या दरामुळे गृहीणीचे बजेट बिघडले आहे. पेट्रोल व डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्याचे जगणे कठीण झाले आहे.
केंद्र शासनाने जंगलतोडीला आळा घालण्यासाठी चुलीच्या धुरापासून महिलांना मुक्ती देण्यासाठी उज्ज्वला योजनेतंर्गत अनुदानावर गॅस कनेक्शन उपलब्ध करुन दिले. त्यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला. मात्र गॅस सिलिंडर भरण्यासाठी आता या योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागत असल्याने त्यांना देखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे गॅस कनेक्शन मिळून सुध्दा त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ९५ हजार गॅस सिलिंडरधारक ग्राहक आहेत. यात उज्ज्वला योजनेच्या ५५ हजार लाभार्थी आहेत. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडरचे दर १०३४ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडरवर शासनातर्फे अनुदान दिले जात असले तरी सुरूवातीला ग्राहकांना पूर्णपणे पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे गृहीणीचे बजेट बिघडले आहे. आधीचे पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे भाजीपाला व किराणा सामानाचे दर वाढले आहे. त्यातच गॅस सिलिंडरच्या दराचा भडका झाल्याने याचा जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांना फटका बसला आहे.