प्रतापगडावर फुलणार भक्तांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 09:08 PM2019-03-03T21:08:16+5:302019-03-03T21:08:41+5:30
नवसाला पावणारा शिवशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे सोमवारी (दि.४) भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. सुमारे ५ लक्ष भाविक हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : नवसाला पावणारा शिवशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे सोमवारी (दि.४) भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. सुमारे ५ लक्ष भाविक हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून जत्थेच्या जत्थे येण्यास रविवारपासूनच सुरुवात झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड हे हिंदू-मुस्लीम जनतेच्या ऐक्याचे प्रतिक आहे. हिंदू भाविक हे महादेवाचे तर मुस्लिम बांधव हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुणी यांचे दर्शन घेतात. एकाचवेळी हिंदू मुस्लीम भाविक येत असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
यावेळी राजकीय पक्षाची नेतेमंडळी सुद्धा हजेरी लावून महाप्रसादाचे वितरण करतात. यामुळेच महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा रविवारपासूच करण्यात आली आहे.
प्रतापगड यात्रेच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी गावाबहेर ३ ठिकाणी वाहने अडविली जातात. त्याठिकाणी पार्र्कींगची सुविधा असते. त्यामुळे भाविकांना बरेच अंतर पायपीट करीत मार्गक्रमण करावे लागते.
ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. गैरकृत्य करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुकडी (खैरी) ते प्रतापगड या मार्गाने वाहनांची वर्दळ अधिक असल्याने अनेकदा खोळंबा निर्माण होतो.
यात्रेकरुंचे आरोग्य जपण्यासाठी यावर्षी ७ ठिकाणी वैद्यकीय कॅम्प लावण्यात येणार आहेत. यात सीतागाई न्हाणी, पहिली पायरी, महादेव मंदिर, दर्गा, बसस्थानक तसेच पहाडावरील महादेव मंदिरात जागा उपलब्ध नसल्याने त्याठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात असणार आहे. तर दर्ग्याखाली एक मेडीकल मोबाईल युनिट असणार आहे. परिवहन महामंडळातर्फे साकोली, गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा व पवनी येथून बसेसची व्यवस्था आहे.
मंगळवारी (दि.५) दुपारी ३ वाजता शाही संदल प्रमूख मार्गाने मार्गक्रमण करीत ख्वाजा उस्मान गणी हारूनी यांच्या दर्ग्यावर पोहचेल. रात्री ९ वाजता कव्वालीचे आयोजन केले आहे.
यावेळी सीमा सदू ताज, किरण जोशी (अमरावती), अनूज जाफर (बालाघाट) अंतू झकास, मनोज पाराशर (वाराशिवणी), युसूफ सागर (भिलाई) उपस्थित राहणार आहेत. हाजी अब्दूल मजीद शोला व मुंबईचे जाहिद नाजा यांची कव्वाली होणार आहे.गुरूवारी सकाळी ९ वाजता लंगर (महाप्रसाद) वितरण होणार आहे.