तब्बल दोन वर्षांनंतर जनरल तिकीट विक्रीला झाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 05:00 AM2022-06-03T05:00:00+5:302022-06-03T05:00:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वेने अनेक गाड्या बंद करीत केवळ विशेष गाड्या सुरू ठेवल्या होत्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वेने अनेक गाड्या बंद करीत केवळ विशेष गाड्या सुरू ठेवल्या होत्या. तसेच जनरल तिकीट विक्रीसुद्धा बंद केली होती. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर आता रेल्वे जनरल तिकीट बंद केलेल्या गाड्यांमध्ये पुन्हा ही सुविधा १ जूनपासून सुरू केली आहे. यासंबंधीचे पत्रही गोंदिया रेल्वे स्थानकाला प्राप्त झाले आहे.
पॅसेंजर, लोकल गाड्यांना एक्सप्रेसचा तर एक्सप्रेस गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देत या गाड्यांमधील जनरल डब्बे रद्द करून जनरल तिकीट विक्री मागील दोन वर्षांपासून बंद केली होती. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षित करून या गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. मात्र, जनरल तिकीट विक्री बंद असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊन बराच कालावधी लोटला असून सर्वच व्यवहार आता पूर्वपदावर आले आहेत. रेल्वेचे वेळापत्रकसुद्धा पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे जनरल तिकीट विक्री पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. मात्र, काही गाड्यांमध्ये ३१ मे पर्यंत तिकीट आरक्षित असल्याने रेल्वे विभागाने १ जूनपासून जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार १ जूनला रेल्वे विभागाने जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पहिल्या टप्प्यात ७० गाड्यांमध्ये जनरल डब्बे
- रेल्वे विभागाने पहिल्या टप्प्यात ७० गाड्यांमध्ये जनरल तिकीट विक्री सुरू करण्याची यादी जाहीर केली आहे. काही गाड्यांमध्ये जून महिन्यापर्यंत तिकीट आरक्षित केले असल्याने जूननंतर या गाड्यांमध्येसुद्धा जनरल तिकीट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
सवलतींसाठी करावी लागणार प्रतीक्षा
- रेल्वे विभागाने ज्येष्ठ, विद्यार्थी, शिक्षक, रुग्ण, पत्रकार यांना रेल्वे प्रवासात सवलत दिली होती. मात्र, कोरोनामुळे या सर्व सवलती बंद केल्या. त्या अद्यापही पूर्ववत केल्या नसून १ जुलैपासून या सर्व सेवा पूर्ववत करण्याचे संकेत रेल्वे विभागाने दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना सवलतीसाठी पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एमएसटीसाठी करावी लागेल प्रतीक्षा
गोंदिया-नागपूर, गोंदिया-चंद्रपूर दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या तीन हजारांवर आहे. पण दोन वर्षांपासून मासिक सिझन पास (एमएसटी) बंद असल्याने प्रवाशांना दररोज तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पण एमएसटीची सुविधा सुरू होण्यास पुन्हा महिनाभर प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तिकीट दरात होणार बचत
- एक्सप्रेस गाड्यांमध्ये जनरल तिकीट विक्री बंद असल्याने प्रवाशांना तिकीट आरक्षित करूनच प्रवास करावा लागत होता. यामुळे दुप्पट पैसे मोजावे लागत होते. मात्र, आता जनरल तिकीट विक्री पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांच्या पैशाची बचत झाली आहे.