कामबंद आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:52 PM2019-07-18T22:52:08+5:302019-07-18T22:52:25+5:30
शासन निर्णयानुसार सफाई कामगारांना नवीन कंत्राट ३१ जुलैपर्यंत न दिल्यास १ आॅगस्टपासून जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सफाई कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासन निर्णयानुसार सफाई कामगारांना नवीन कंत्राट ३१ जुलैपर्यंत न दिल्यास १ आॅगस्टपासून जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सफाई कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला.
गडचिरोली येथील आदिवासी परधान समाज भवनात बुधवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष छगन महातो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. सफाई कामगारांना नवीन कंत्राट त्वरित देण्याचा शासनाचा आदेश असला तरी गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने नवीन कंत्राट देण्याची कार्यवाही अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे सफाई कामगारांना जुन्याच कंत्राटानुसार काम करावे लागू शकते. जुन्या कंत्राटदारांना मुदतवाढ देताना नवीन सुधारित कंत्राटानुसार मुदतवाढ देणे आवश्यक आहे, असेही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. कंत्राटदाराने कामगारांचे इपीएफ न भरल्यास दोषी कंत्राटदारावर कामगार न्यायालयात संघटनेच्या वतीने खटला दाखल करण्याचा निर्णय याप्रसंगी घेण्यात आला.