शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 01:30 AM2017-05-13T01:30:20+5:302017-05-13T01:30:20+5:30

तालुक्यातील ग्राम बाघोली येथील नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवानगी पांदणरस्ता तयार करण्यात आला.

Get justice for the farmers | शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या

शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या

Next

दोषींवर कारवाई करा : शेतकरी पटले यांचा आत्मदहनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील ग्राम बाघोली येथील नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवानगी पांदणरस्ता तयार करण्यात आला. हा पांदण रस्ता रेकॉर्ड वर नसताना व शेतकऱ्यांना याची गरज नसताना कुठलाही मोबदला न देता तयार करण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर या कामावर न जाणाऱ्या मजुरांची नावे टाकून शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत दोषींवर १९ मे पर्यंत कार्यवाही करा अन्यथा २० मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी रुपचंद पटले यांनी मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
बाघोली येथील शेतकरी मंगरु राणे ते इंद्रराज पटले यांच्या शेतापर्यंत मे २०१६ मध्ये मग्रारोहयो अंतर्गत पांदणरस्ता तयार करण्यात आला. रेकॉर्डमध्ये या पांदण रस्त्याची नोंद नाही. यापुर्वी यांच्याच शेतातून कालवा गेला व आता पांदन रस्ता गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे तीन तुकडे झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. पांदनरस्त्याचे काम सुरु होताच शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये काम बंद करावे अशी तक्रार नोंदवून सुद्धा दखल घेण्यात आली नाही व रस्ता पूर्ण करण्यात आला. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी अनेक तक्रारी करुन मोबदला मागितला.
या कामात शेतकऱ्यांच्या घरच्या व गावातील कामावर न जाणाऱ्या २० ते २५ मजुरांची नावे घालून त्यांना बँक खात्यावर जमा झालेली मजुरी परत मागण्यात आली व शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला. ही बाब अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा ग्राम रोजगार सेवकावर अंगणवाडी मदतनीसच्या नावाने सात हजार २१४ रुपये काढल्याचा ठपका ठेऊनही रक्कम वसूल करुन ग्रामसभेच्या माध्यमाने कार्यवाहीचा आदेश देण्यात आला. पण या कामावर झालेला मोठा भ्रष्टाचार दाबल्याचा प्रयत्न उघडपणे दिसून सुद्धा प्रकरणात डोळे झाक होत आहे.
यात नऊ शेतकऱ्यापैकी मंगरु चन्ने, नारायण राणे, जायाबाई सोनवाने, रुपचंद हरिचंद पटले, देवचंद हरिचंद पटले, रामचंद पटले, अनंतराम पटले, इंद्रराज पटले या आठ शेतकऱ्यांनी आपल्या गेलेल्या जमिनीचा मोबदला मागितला पण संबंधित अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असून थातूर-मातूर चौकशी करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. शासनाने मजुरांना काम मिळावे म्हणून मग्रारोहयोची कामे सुरु करुन नियमाच्या अधीन राहून कामे सुरु करण्याचा आदेश असताना सुद्धा नियम व कायद्याला डावलून मग्रारहोयोची कामे धडाक्यात सुरु आहे.
यात कामावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे शासनाचा निधी व्यर्थ वाया जात आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे. यासर्व कामाची पुन्हा चौकशी आयुक्तामार्फत शेतकरी व गावकऱ्यांपुढे क रून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयावा व दोषींवर कार्यवाही करावी असे निवेदन मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांना देण्यात आले. कार्यवाही न झाल्यास २० मे ला आत्मदहन करणार असा शेतकरी पटले यांनी इशारा दिला आहे.

Web Title: Get justice for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.