आधुनिक पद्धतीची शेती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:57 PM2017-12-15T23:57:20+5:302017-12-15T23:58:18+5:30
कमी पाण्याच्या पिकांची शेती, फलोत्पादनाची शेती, फुलांची शेती करुन आपली आर्थिक परिस्थिती मजूबत करा. आधुनिक पद्धतीची शेती केल्यानेच आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडू शकेल, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : कमी पाण्याच्या पिकांची शेती, फलोत्पादनाची शेती, फुलांची शेती करुन आपली आर्थिक परिस्थिती मजूबत करा. आधुनिक पद्धतीची शेती केल्यानेच आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडू शकेल, असे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
देवरी तालुक्यातील लगतच्या सेरपार येथे गुडमॉर्निंग पथकातंर्गत मुख्य कार्यपालन अधिकारी ठाकरे यांनी भेट दिली. दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत उपस्थित शेतकºयांना पर्यावरण व जलसंवर्धनाचे महत्व सांगताना ते बोलत होते.
या वेळी उपमुख्य कार्यकारी (स्वच्छता) अधिकार राठोड, खंडविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर, माजी जि.प. सदस्य राजेश चांदेवार, दिनबंधू, ग्रामीण विकास संस्था देवरीचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोठेकर यांच्यासह पंचायत समितीच्या सर्व विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, रोजगार सेवक व अंगणवाडी सेविका यांचा समावेश होता. दरम्यान उपमुख्य कार्यपालन अधिकारी राठोड यांनी गावातील व्यक्तिगत शौचालय कशासाठी, यावर मार्गदर्शन केले. आपले गाव स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी ग्रामवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील प्रत्येक भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे. संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त व्हावा. यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पहाटेच्या सुमारास गावागावांत जाऊन गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता व शौचालयाचे महत्त्व सांगत आहेत. स्वयंप्रेरणेने शासनाची कुठलीही मदत न घेता शौचालय बांधण्यास नागरिकांंना तयार करीत आहेत. जिल्हा संपूर्णत: हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. एवढेच नाही तर उघड्यावर शौचास गेल्याने आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, यासह कायदेशीर दंडास आपण कसे बळी पडतो, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच तालुक्यातील प्रत्येक शेतकºयाचे, कुटुंबप्रमुखाचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यावरही मार्गदर्शन करण्यात आले. संचालन ग्रामसेवक बंसोड यांनी केले.
आभार कुलदीप लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी पराते, ग्रामसेवक संजय कडव, कटरे, दरवडे, अंबादे, रामटेके, मेश्राम, देशमुख, वैष्णव, चौधरी, कृषी तांत्रिक संजय डोये यांनी सहकार्य केले.