परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:15 PM2018-09-16T22:15:16+5:302018-09-16T22:16:23+5:30
वैयक्तिक स्वच्छता व्यक्ती पाळते, आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो, मात्र परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वैयक्तिक स्वच्छता व्यक्ती पाळते, आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो, मात्र परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी यांनी केले.
येथील स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, गोंदिया पंचायत समितीच्या सभापती माधुरी हरिणखेडे, सालेकसा पंचायत समितीच्या सभापती अर्चना राऊत, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश बागडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ए.के.मडावी, समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, राजेश राठोड, डॉ. शाम निमगडे, राजेश वासनिक, आर.एस.वैराडकर, संजय विश्वकर्मा उपस्थित होते.
प्रत्येक व्यक्तीने श्रमदान करण्याची गरज व्यक्त करुन मुकाअ दयानिधी यांनी वर्तणुकीतील बदलावर भर दिला. ते म्हणाले, कोणतेही खाद्य पदार्थ घेतल्यास त्यातील टाकाऊ कचरा आपण उघड्यावरच फेकतो. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणात अशाप्रकारे कचरा टाकून आपण आपलाच परिसर अस्वच्छ करतो. ही प्रवृत्ती बदलविणे आता गरजेचे असून, कचरा योग्य ठिकाणात टाकण्याची सवय लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या गुडमार्निग पथक उपक्रमाचे कौतुक करुन स्वच्छता ही सेवा या उपक्रमात ग्रामपंचायतीनी उत्कृष्ट कार्य करुन आपले गाव स्वच्छ करण्याचे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या प्लायरचे विमोचन तथा पाणी व स्वच्छतेच्या बसस्थानक उद्घोषणचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी आपले गाव व परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये तर आभार शालेय स्वच्छतातज्ज्ञ भागचंद रहांगडाले यांनी मानले. यशस्वीतेसाठी सूर्यकांत रहमतकर, राजेश उखळकर, पाणी गुणवत्तातज्ञ मुकेश त्रिपाठी, दिशा मेश्राम, जितेंद्र येरपुडे, बालकिशोर पटले, विशाल मेश्राम, देवानंद बोपचे, शोभा फटींग, छाया सहारे, रमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले.
जि.प.मध्ये स्वच्छता उपक्रम सोमवारी
‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार येत्या सोमवारी (दि.१७) सकाळी ७ ते ८.३० दरम्यान जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात दोन तास श्रमदान करुन स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे.