आपत्ती निवारणासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 01:51 AM2016-05-28T01:51:21+5:302016-05-28T01:51:21+5:30

पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे,

Get ready for emergency relief | आपत्ती निवारणासाठी सज्ज राहा

आपत्ती निवारणासाठी सज्ज राहा

Next

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सभा
गोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यातील ८७ गावे पुराने बाधित होतात. तसेच गोंदिया शहरातील नाल्याचे पाणी अतिवृष्टीमुळे लोकांच्या वस्त्यांमध्ये शिरते. त्यामुळे तेथील कुटुंबांना या काळात सुरिक्षत स्थळी हलवावे. नाल्यांची साफसफाई व नाल्यातील गाळ काढण्याचे काम आठ दिवसांच्या आत करावे. नाल्यांमध्ये कचरा, पॉलीथिन साचून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी गटारे, नाले वाहती करावी.
८७ पूरबाधित गावांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देवून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, या गावातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पूरपरिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नदी व नाल्यांच्या सरळीकरणाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करावी. त्यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरास अडथळा निर्माण होणार नाही. लोकवस्तीत पुराचे पाणी शिरणार नाही. अशा लोकवस्तीतील नागरिकांना बाधित अथवा स्थलांतरीत होण्याची वेळ येणार नाही.
पूरबाधित गावात बाधित होण्याची कारणे शोधून त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जी कामे करावी लागणार आहेत, त्या कामांचे १० दिवसात अंदाजपत्रक तयार करावेत. त्या कामासाठी आवश्यक निधीची मागणी राज्य आपत्ती प्राधिकरणाकडे लवकर करता येईल. बोटी, होड्या या काळात सुस्थितीत व सुसज्ज ठेवाव्यात. यंत्रणांनी योग्य समन्वयातून आपत्तीवर मात करावी, असे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, आपत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या स्थळांचे तातडीने सर्व्हेक्षण करावे. जी गावे पुराने बाधित होतात त्या गावातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी असावेत. तसेच पुरेसा औषधांचा साठा असणेही महत्वाचे आहे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर पिण्याच्या पाण्याचे स्रेत असलेल्या ठिकाणी टाकावे. पाणी पुरवठा योजना पुराच्या पाण्यात सापडल्यास पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी जोखीम न घेता या योजना रिमोट कंट्रोलने सुरू करण्यासाठी लक्ष द्यावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे यांनी सांगितले की, सालेकसा व आमगाव तालुक्यातील काही गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो. रात्रीच्या वेळी असा प्रसंग उद्भवल्यास एखाद्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेणे शक्य होत नाही. प्रसंगी जीव जाण्याची वेळसुध्दा येऊ शकते. अशाप्रकारची परिस्थिती उदभवू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व बाघ इटियाडोह विभागाने वेळीच लक्ष घालून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.
सभेला समितीचे सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, बाघ व इटियाडोहचे कार्यकारी अभियंता छप्परघरे, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पठाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी के.डी. मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा रक्त संक्र मण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांची उपस्थिती होती.
या वेळी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता समीर बनसोडे यांनी सादरीकरण करून जिल्ह्यातील पूरबाधित गावांची माहिती तसेच रेड व ब्ल्यू झोनमध्ये येत असलेल्या गावांची माहिती दिली. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Get ready for emergency relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.