धान खरेदी संबंधित समस्या त्वरित मार्गी लावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:54+5:302021-05-10T04:28:54+5:30
देवरी : शासनाकडून आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीची ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत होती. परंतु, कोरोना संसर्गाच्या संचारबंदीमुळे ...
देवरी : शासनाकडून आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीची ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत होती. परंतु, कोरोना संसर्गाच्या संचारबंदीमुळे विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रावर विक्री केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता एक दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी. वनहक्क जमिनीचे पट्टेधारक व इतर शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे मिळाले नाही, ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी आ. सहषराम कोरोटे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी केलेले धान अद्याप उचल करण्यात आले नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावरील धानाच्या घटात जास्त प्रमाणात वाढ होणार आहे. तरी धान खरेदी केंद्रावरील घटात वाढ करून देण्यात यावे या विषयावर आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. ६) राज्याचे अन्न पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आणि या संदर्भात निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या धानविषयी समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. यावर पाटील यांनी संबंधित खात्याचे मंत्री महोदयांशी चर्चा करून सदर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपककुमार मीना उपस्थित होते.