मदत मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार
By admin | Published: May 23, 2016 01:48 AM2016-05-23T01:48:43+5:302016-05-23T01:48:43+5:30
शनिवारच्या चक्रीवादळाच्या तांडवाने घरांसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. बनाथर गावात चक्रीवादळाच्या तीव्रतेत दिलीप बर्वे हा व्यक्ती ३०० मीटर अंतरावर फेकला गेला.
गोंदिया : शनिवारच्या चक्रीवादळाच्या तांडवाने घरांसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. बनाथर गावात चक्रीवादळाच्या तीव्रतेत दिलीप बर्वे हा व्यक्ती ३०० मीटर अंतरावर फेकला गेला. तसेच बडगाव येथील १० वर्षीय चिमुकली २०० मीटर अंतरावर फेकली गेली. या घटनांमुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेचा अंदाज बांधणे अवाक्याबाहेर असल्याचे प्रत्यक्ष केलेल्या पाहणीतून दिसून आले. मात्र संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्तांना भेटीदरम्यान धीर देताना दिली.
जिल्ह्यात शनिवारी चक्रीवादळाने चांगलाच धुमाकूळ घातला. गोंदिया तालुक्यासह जवळपास सर्वच तालुक्यात अतोनात नुकसान झाले. गोंदिया तालुक्यातील बनाथर, शिरपूर, रावणवाडी, खातिया, बिर्सी, कोचेवाही, सतोना, बडगाव, परसवाडा, कामठा, बिरसोला, काटी, जिरूटोला यासह जवळपास तालुक्यातील ५० टक्के गावे बाधित झाली. प्रत्येक गावातील ५० हून अधिक घरांची छते उडाली व शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील हजारो कुटुंबे बेघर झाले. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची दखल माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी गावोगावी जावून नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेवून पाहणी केली. यावेळी त्यांनी संकटात सापडलेल्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून जिल्ह्यात व गोंदिया तालुक्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा, अशी विनंती केली. त्यानुसार रविवारी २२ मे रोजी उपविभागीय अधिकारी केएनके राव हे महसूल अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. या गंभीर संकटातून शेतकरी व नागरिकांनी घाबरू नये, शासनाकडून कोणत्याही परिस्थितीत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आपण मागेपुढे पाहणार नाही, अशी ग्वाही विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांवा देवून धीर दिला.