पुन्हा कठोर निर्णय लागण्यापूर्वी लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 05:00 AM2022-06-10T05:00:00+5:302022-06-10T05:00:06+5:30

गेल्या काही दिवसांत राज्यात व काही जिल्ह्यांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोबतच कोरोना आता गेला असे गृहीत धरू नये. कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने १ जूनपासून ‘हर घर दस्तक’ ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ३१ जुलैपर्यंत  ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे.

Get vaccinated again before a tough decision is made | पुन्हा कठोर निर्णय लागण्यापूर्वी लसीकरण करा

पुन्हा कठोर निर्णय लागण्यापूर्वी लसीकरण करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना पासून बचाव करण्यासाठी एकमेव उपाय लसीकरण आहे. मुंबई व देशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी पहिला डोस झाला असेल तर दुसरा डोस घ्यावा. दुसरा झाला असेल तर बूस्टर डोस घ्यावा. आपल्या घरातील मुलांचे डोस पूर्ण झाल्याची खात्री करा, कोरोनाला सहजतेने न घेता नागरिकांनी लसीकरणाकडे लक्ष वेधावे असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या कोरोना लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते.  बैठकीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच तज्ज्ञांशी यासंदर्भातील निरीक्षणावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला टास्क फोर्सच्या सदस्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम व सर्व तालुका आरोग्य अधिकारी व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांत राज्यात व काही जिल्ह्यांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोबतच कोरोना आता गेला असे गृहीत धरू नये. कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने १ जूनपासून ‘हर घर दस्तक’ ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ३१ जुलैपर्यंत  ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. १२ वर्षांवरील प्रत्येक बालकापासून वयस्क नागरिकांपर्यंत डोस देण्यासाठी घरापर्यंत लसीकरण टीम येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले.
हरघर  दस्तक मोहीम अंतर्गत जिल्ह्यात अधिक ताकदीने सर्वेक्षण आरोग्य तपासणी व समुपदेशन राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या संभाव्य लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुंडे यांनी केले आहे. ज्या गावांमध्ये लसीकरण करताना गावकऱ्यांचा विरोध आहे, त्या गावांना भेटी देऊन गावातील नागरिकांचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करण्यात यावे. तालुकास्तरावरून उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष सभा घेऊन लसीकरणाबाबतच्या अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
लसीकरणाची गती कमी असलेल्या ठिकाणी अधिक गतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी तसेच गावांमध्ये प्रतिष्ठित नागरिकांनी, युवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. लक्षणे दिसली की चाचणी करावी. पॉझिटिव्ह आढळून आल्यास कोणत्याही रुग्णाला आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये सक्तीने भरती करण्यात आलेले नाही. घरी विलगीकरणात रुग्णांना राहता येणार आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आले तरी घाबरू नये. मात्र, लसीकरणापासून वंचित राहू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची खातरजमा करा
- २६ रोजी शाळांची घंटा वाजणार आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झाले अथवा नाही, याबाबत शाळांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. तसेच विद्यार्थ्यांचे पूर्ण लसीकरण होईल याची खातरजमा करावी. शाळा सुरू झाल्यानंतर याबाबतची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे. 

हर घर दस्तक मोहीम १ जूनपासून सुरू करण्यात आली, ती आता ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील हर घर दस्तक मोहिमेदरम्यान लसीकरणात १२ ते १४ व १५ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांना प्राधान्याने लसीकरण तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर व ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांनी प्रिकॉशनरी डोस घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले.

 

Web Title: Get vaccinated again before a tough decision is made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.