‘त्या’ अनाथ मुलीच्या लग्नासाठी संसारोपयोगी वस्तुंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 09:33 PM2019-01-12T21:33:55+5:302019-01-12T21:34:31+5:30
जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावलेले १७ अनाथ मुले-मुली परिसरात वास्तव्याला आहेत. जवळच्या आप्त नातलगाच्या कृपादृष्टीने निरागस मुले जीवन जगत आहेत. समाजातील काही दानशुरांच्या मदतीने त्यांना वेळोवेळी मदत केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावलेले १७ अनाथ मुले-मुली परिसरात वास्तव्याला आहेत. जवळच्या आप्त नातलगाच्या कृपादृष्टीने निरागस मुले जीवन जगत आहेत. समाजातील काही दानशुरांच्या मदतीने त्यांना वेळोवेळी मदत केली जात आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मांडोखाल येथील एका अनाथ मुलीचे लग्न येत्या एप्रिल महिन्यात होऊ घातले आहे. सामाजिक बांधिलकी अंगीकारुन दैनिक लोकमतने त्या अनाथ मुलीच्या लग्नासाठी पुढे या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. ती बातमी वाचून गोंदियाचे सेवानिवृत्त रेल्वे तिकीट निरीक्षक व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कठाणे यांनी त्या अनाथ मुलीला संसारउपयोगी साहित्य भेट देऊन मदत केली.
गोंदियाच्या कुंभारे नगरात वास्तव्याला असणारे महेंद्र कठाणे यांनी आपल्या एकुलत्या एक मिनाल या मुलाच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून एक आगळा-वेगळा सामाजिक दायित्व पार पाडण्याचा कार्यक्रम रविवारला (दि.६) आयोजित केला होता. प्रसंगी ज्योती ठाकरे या अनाथ मुलीला संसारपयोगी वस्तुंचा संच कठाणे दाम्पत्यांनी भेट दिला. या वेळी प्रा.डॉ. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे, धनेंद्र भुरले उपस्थित होते. बोंडगावदेवी परिसरातील अनाथ मुलांना वेळोवेळी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अमरचंद ठवरे लोकमतच्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करुन मदतीचे आवाहन करीत असतात. जिल्ह्यातून भरभरुन प्रतिसाद सुद्धा मिळतो. गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्यां बेदरकर यांच्या सहकार्याने आजही तालुक्यातील १७ अनाथ मुलांना घरपोच मदत केली जात आहे.
कपाट भेट देणार
अनाथ मुलीच्या लग्न कार्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्यासाठी सामाजिक दानदात्यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ तयारी दर्शविली. अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे.महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.कल्पना सांगोळे यांनी गोदरेज कपाट भेट देणार असल्याचे सांगितले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनदास गणवीर यांनी सुद्धा मदतीसाठी तयारी दर्शविली आहे.
लोकमतचा पुढाकार
अनाथांना नाथ मिळून त्यांच्या संसारात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी दैनिक लोकमतने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. लोकमतच्या वृत्तांनी अनाथांना मदतीचा ओघ वाढत आहे. अनाथ मुलीच्या लग्न कार्यासाठी आपलाही हातभार लागावा या हेतूनी दानदात्यानी पुढे यावे असे अमरचंद ठवरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी कळविले आहे.