जिल्ह्यातील ११७ शाळांची बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:14 AM2018-02-17T00:14:44+5:302018-02-17T00:15:25+5:30
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही मागे राहू नये, तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी संगणक शिक्षणापासून ते डिजिटल स्कूल संकल्पना राबविली जात आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही मागे राहू नये, तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी संगणक शिक्षणापासून ते डिजिटल स्कूल संकल्पना राबविली जात आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या तब्बल ११७ शाळांचा विद्युत पुरवठा थकीत वीज देयकाअभावी खंडीत करण्यात आला आहे. परिणामी या शाळांची बत्ती गुल झाली असल्याने शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाºया योजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०६५ शाळा असून या सर्व शाळा डिजिटल झाल्याचा दावा शिक्षण विभागाने यापूर्वीच केला आहे. मात्र यापैकी ११७ शाळांचा वीज पुरवठा थकीत देयकामुळे खंडीत करण्यात आला. जि.प.शिक्षण विभागाने शंभर टक्के शाळा डिजिटल असल्याच्या दाव्याची सुध्दा पोल खोल झाली आहे. विद्युत पुरवठा खंडीत असल्याने लाखो रुपयांचा निधी खचून शाळांना उपलब्ध करुन दिलेल्या संगणकावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शाळांना संगणक उपलब्ध करुन देण्यात आले त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १३६ शाळा, आमगाव ९५, देवरी ११८, गोंदिया १६९, गोरेगाव ९८, सडक अर्जुनी १०४, सालेकसा ८२, तिरोडा तालुक्यातील १३७ शाळांचा समावेश आहे.
वीज देयकाचा भरणा न केल्यामुळे आमगाव तालुक्यातील २१, अर्जुनी मोरगाव १, देवरी २६, गोंदिया १९, गोरेगाव ११, सडक अर्जुनी ११, सालेकसा ३५ आणि तिरोडा तालुक्यातील २ शाळांचा समावेश आहे.
या शाळांमधील वीज पुरवठा खंडीत असल्याच्या वृत्ताला शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी सुध्दा दुजोरा दिला आहे. शाळांना वीज देयक भरण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती आहे.
खर्चाच्या तुुलनेत कमी निधी
शाळांना विविध कामांकरीता वर्षभरासाठी जिल्हा परिषदेकडून १० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्यातून वीज बिलाचा भरणा, शाळेची देखभाल दुरूस्ती, साहित्य खरेदी आणि विविध कामे करावी लागतात. मात्र संगणक आणि डिजिटील स्कूल यासारख्या उपक्रमांमुळे शाळांना महिन्याकाठी ७०० ते ८०० रुपयांचे वीज बिल येते. त्यामुळे अल्प निधीतून वीज बिलासह इतर कामे करायची कशी असा बिकट प्रश्न मुख्याध्यापकांपुढे निर्माण झाला आहे. परिणामी दिल्या जाणाºया निधीत वाढ करण्याची गरज आहे.
या उपक्रमांवर प्रश्न चिन्ह
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, अध्यय कुटी, संगणक शिक्षण, डिजिटल स्कूल आदी उपक्रम राबविले जात आहे. त्याचा मोठा गाजावाजा शिक्षण विभागाकडून केला जात आहे. मात्र ज्या शाळांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्या शाळेतील या उपक्रमांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.