धडकेत बालिका जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 01:23 AM2017-07-03T01:23:01+5:302017-07-03T01:23:01+5:30
सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी (झायलो) या गाडीने जबरदस्त धडक मारल्याने एक ७ वर्षीय बालिका जागीच ठार झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी (झायलो) या गाडीने जबरदस्त धडक मारल्याने एक ७ वर्षीय बालिका जागीच ठार झाली. ही घटना रविवार (दि.२) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान बोंडगावदेवी येथे घडली.
अर्जुनी मोरगाव ते सानगडी रस्त्यावरील पतिराम बोरकर यांच्या घरासमोर ही घटना घडली. सपना उमेश मस्के (७) रा. झरपडा असे त्या अपघातामध्ये ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
झरपडा निवासी उमेश मस्के हे रविवारी बोंडगावदेवी येथे आपल्या सासुरवाडीला जाण्यासाठी पत्नी व दोन मुलींसह प्रवासी गाडीने निघाले होते. बोंडगावदेवी येथे घराजवळ प्रवासी गाडी थांबवून उमेश, मुली, पत्नीसह गाडीतून उतरले.
रस्त्यावरुन जवळच असलेल्या आजोबाच्या घरी जाण्यासाठी ओढ लागली असल्याने सपना मार्ग काढत असतानाच सानगडीकडून आलेल्या सुसाट वेगाने चारचाकी गाडीने जबरदस्त धडक मारल्याने ७ वर्षीय सपना रक्ताच्या थारोड्यात पडून जागीच गतप्राण झाली.
यानंतर धडक मारलेल्या गाडीने अतिवेगाने पोबारा केला. घटनास्थळी असलेल्या जागरुक युवकांनी त्या वाहनाचा क्रमांक लक्षात ठेवून अर्जुनी मोरगाव पोलिसांना कळविण्यात आले.
पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता झायलो (एमएच ३१/डीव्ही ६१३२) क्रमांकाची गाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे सांगितले.
घटनास्थळी पोलीस चौकशी करण्यासाठी रवाना झाले होते. बातमी लिहीपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.