आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या; वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घडला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 04:28 PM2022-06-27T16:28:05+5:302022-06-27T16:30:30+5:30
वर्षांच्या आत्महत्येने नवरगावात शोककळा पसरली होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
गोंदिया :वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी १९ वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील मामा चौक येथील आदिवासी मुलीच्या वसतिगृहात शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा कुवरलाल मसे (१९) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
तालुक्यातील नवरगाव येथील वर्षा मसे ही विद्यार्थिनी ४ वर्षांपासून शिक्षणाकरिता गोंदिया येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहत होती. शुक्रवारी रात्री वर्षाने आपल्या मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा केला. त्यानंतर ती झोपली. शनिवारची पहाट वर्षासाठी नवचैतन्य घेऊन येईल अशी आशा बाळगत सकाळी वर्षाच्या मैत्रिणी पेपर देण्यासाठी महाविद्यालयात गेल्या. पेपर देऊन परत वसतिगृहात आल्यावर तिच्या खोलीचे दार बंद असल्याने तिच्या मैत्रिणींनी दार ठोठावले. मात्र वर्षाने दार उघडले नाही. अखेर वॉर्डनच्या साहाय्याने दार तोडण्यात आले. वर्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
लगेच याची माहिती शहर पोलिसांना व वर्षाच्या कुटुंबाला देण्यात आली. पोलीस आणि घरच्या मंडळींनी घटनास्थळ गाठत कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया शासकीय रुग्णालयात पाठविला. वर्षांच्या आत्महत्येने नवरगावात शोककळा पसरली होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.