मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:36 PM2019-07-28T23:36:08+5:302019-07-28T23:36:35+5:30
आपल्या पुरुष प्रधान देशात आजही मुलींना मुलांपेक्षा कमी दर्जा दिला जातो. मुलांना घराण्यातील वारस व वंशाचा दिवा समजून त्यांना मुलीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. माणूस मेल्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी मुलाच्या हस्ते देण्याची रुढी व परंपरा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या पुरुष प्रधान देशात आजही मुलींना मुलांपेक्षा कमी दर्जा दिला जातो. मुलांना घराण्यातील वारस व वंशाचा दिवा समजून त्यांना मुलीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. माणूस मेल्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी मुलाच्या हस्ते देण्याची रुढी व परंपरा आहे.परंतु ही रुढी व परंपराना मोडीत गोंदियाचे पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त संचालक तथा क्षत्रीय मराठा कलार समाजाचे जिल्हा अध्यक्ष राहिलेले डॉ.रामनारायण तेजराम साव भोयर (६५) रा. कुडवा रोड यांच्या निधनानंतर गोंदियाच्या पार्वती घाटावर शनिवारी (दि.२६) अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ.भोयर यांच्या पार्थीवाला त्यांच्या सातही मुलींनी एकत्रित अग्नी देऊन समाजापुढे आदर्श ठेवला.
शहरातील कुडवा रोड मार्गावर राहणारे पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. रामनारायण तेजराम साव भोयर यांचे शुक्रवारी (दि.२६) सकाळी ९ वाजताच्या सुमारास हद्यविकाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी आपल्या जिवनात मुलगा नसल्याची कसल्याही प्रकारची खंत न बाळगता त्यांनी आपल्या सातही मुलींना उच्च शिक्षण व संस्कार देऊन त्यांचा विवाह करुन दिला. ते १२ वर्ष क्षत्रीय मराठा कलार समाजाचे जिल्हा अध्यक्ष होते.त्यांच्याच कार्यकाळात गोंदिया येथे कलार समाज भवनाचे बांधकाम करण्यात आली.
त्यांच्यावर शनिवारी (दि.२७) गोंदिया येथील पार्वती घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारात डॉ. भोयर यांच्या पार्थीव शरीराला त्यांची मुलगी अनिता धपाडे यांच्यासह सातही मुलींनी जुन्या रुढी व परंपराना मोडीत अग्नी देऊन समाजापुढे आदर्श ठेवला.
याप्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,नातेवाईक,मित्र मंडळी व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.