मुलींनी आपली सुरक्षा स्वत: सुनिश्चीत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:02 PM2019-02-18T22:02:42+5:302019-02-18T22:03:07+5:30
गेम्स स्पोर्टस अँड करियर डेवलपमेंट फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. या आत्मसुरक्षा शिबिरात शिकलेल्या कलेचा उपयोग मुलींनी कठीण प्रसंगात करावा तसेच दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठीही पुढे यावे. मुलींनी आपली सुरक्षा स्वत: सुनिश्चित करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गेम्स स्पोर्टस अँड करियर डेवलपमेंट फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. या आत्मसुरक्षा शिबिरात शिकलेल्या कलेचा उपयोग मुलींनी कठीण प्रसंगात करावा तसेच दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठीही पुढे यावे. मुलींनी आपली सुरक्षा स्वत: सुनिश्चित करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.
गेम्स स्पोर्टस अँड करियर डेवलपमेंट फाऊंडेशनच्यावतीने निर्भय बेटी सुरक्षा अभियानांतर्गत आयोजीत आत्मसुरक्षा शिबिराच्या समारोपीय महाशिबिरात इंदिया गांधी स्टेडियम येथे ६ फेब्रुवारी रोजी त्या बोलत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, वन अधिकारी स्वाती डुमरे, मानवाधिकार संघटनेच्या धर्मिष्ठा सेंगर, संघटनेचे सचिव आदेश शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, प्रोग्रेसिव्ह स्कूलचे संचालक डॉ. निरज कटकवार, रवी आर्य, फाऊंडेशनचे संघरक्षक लोकेश यादव, अध्यक्ष चेतन मानकर उपस्थित होते.
याप्रसंगी गांगरेड्डीवार यांनी, मुलींना क्रीडा क्षेत्रातून पुढे येण्याचा मार्ग दाखवित मार्गदर्शन केले. दरम्यान, २० मुली, २० प्रशिक्षक व प्राचार्यांचा स्मृतीचिन्हे देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, महाशिबिरात सुमारे २ हजार मुलींनी प्रशिक्षण शिबिरात गिरविलेल्या धड्यांचे प्रात्यक्षिक उपस्थित पाहुणे व नागरिकांसमोर करून दाखविले. संचालन मुजीब बेग यांनी केले. आभार लोकेश यादव यांनी मानले. कार्यक्रमासाठी दिपक सिक्का, निलेश फुलबांधे, संतोष बिसेन, अंकुश गजभिये, अंजनकर, कपासे, ज्वाला तुरकर, निखील बरबटे, पूजा मोटघरे, आकांक्षा कटकवार, कृष्णा विभार, मयूर बघेले आदिंनी सहकार्य केले.
८ हजार मुलींना दिले नि:शुल्क प्रशिक्षण
फाऊंडेशनच्या माध्यमातून निर्भय बेटी सुरक्षा अभियानांतर्गत २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत शहरातील २० शाळांत हे आत्मसुरक्षा शिबिर घेण्यात आले. वर्ग ६ ते १० पर्यंतच्या मुलींना या प्रशिक्षणात कराटे, तायक्वांडो, कुंफू व आत्मसुरक्षेचे धडे नि:शुल्क देण्यात आले. अशा प्रकारे शिबिरांचे आयोजन करून फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ८ मुलींना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात आले आहे.