मेहनतीचा मोबदला द्या हो ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:11 AM2018-02-17T00:11:53+5:302018-02-17T00:12:20+5:30
शासकीय काम आणि महिनाभर थांब असे विनोदाने म्हटले जाते,मात्र तब्बल वर्षभराचा कालावधी लोटूनही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील २१६ मजुरांना मजुरीचे पैसे मिळाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय काम आणि महिनाभर थांब असे विनोदाने म्हटले जाते,मात्र तब्बल वर्षभराचा कालावधी लोटूनही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील २१६ मजुरांना मजुरीचे पैसे मिळाले नाही. दिवसभर घाम गाळून केलेल्या मेहनतीची मजुरी मिळण्यासाठी ते मागील वर्षभरापासून शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित अधिकाऱ्यांना ‘मेहनतीचा मोबदला द्या हो’ अशी विनंती करीत आहे. मात्र प्रशासनाला अद्यापही पाझर न फुटल्याने त्यांची पायपीट कायम आहे.
देशात सर्वाधिक रोजगार देणारा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा प्रशासनाची पाठ नुकतीच थोपाटण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सुध्दा आम्ही कशा उपाय योजना करुन मजुरांना सर्वाधिक कामे उपलब्ध करुन दिली. याचे गोडवे गायले, त्यात काही गैर नाही. मात्र एकीकडे मजुरांना सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देत असताना दुसरीकडे याच मग्रारोहयोतंर्गत काम केलेल्या २१६ मजुरांना कामाची मजुरी मिळण्यासासाठी वर्षभरापासून पायपीट करावी लागत आहे. ही कुणालाच न पटणारी बाब आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात सडक अर्जुुनी तालुक्यातील डव्वा येथे मग्रारोहयोतंर्गत जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग व ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या कामावर २१६ मजुरांनी काम केले. याला वर्षभराचा कालावधी लोटला मात्र मजुरांना अद्यापही मजुरी मिळाली नाही. हातावर आणून पानावर खाणाºया मजुरांच्या कुटुंबीयांवर मजुरी न मिळाल्याने उपासमारीची पाळी आली आहे. मजुरी मिळावी यासाठी मजुरांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकवेळी टोलावाटोलवीचे उत्तर देत त्यांना परतावून लावले. आज ना उद्या मजुरी मिळेल या आशेवर हे मजूर होते. मात्र वर्र्षभराचा कालावधी लोटूनही त्यांना मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आली आहे.एकीकडे शासन व प्रशासनातर्फे मग्रारोहयोच्या कामांचा मोठा गाजावाजा केला केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र या कामावर काम करणाऱ्यांना मजुरीसाठी वर्षभरापासून मेहनतीची मजुरी मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या पायºया झिजवाव्या लागत आहेत. मात्र यानंतरही प्रशासनाला पाझर फुटला नसल्याचे चित्र आहे.
जि.प.सदस्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
डव्वा येथील मग्रारोहयोच्या कामावरील २१६ मजुरांची थकीत मजुरी त्वरीत देण्यात यावी. यासाठी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेवून या मजुरांच्या मजुरीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. या संबंधीचे पत्र सुध्दा त्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी मजुरीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.