कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:10+5:302021-07-22T04:19:10+5:30
गोंदिया : कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने ...
गोंदिया : कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.२०) काळी फीत लावून आंदोलन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय विरोध दिन पाळत जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे देशातील २९ राज्यांतील ८० लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे या आंदोलनात नेतृत्व केले. कोरोना महामारीच्या दोन लाटा आल्या असून या महामारीच्या संकटाचे निराकरण धैर्याने करण्याचे शौर्य प्रत्येक राज्यातील आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे. अशा या कर्तव्यनिष्ठ कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा संकोच करणारे कायदे सध्या मंजूर केले जात असून शासनाच्या या धोरणाचा राज्य कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळी फीत लावून निषेध व्यक्त केला.
तसेच, प्रत्येक राज्यातील रिक्त पदे भरावी, सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेले आर्थिक लाभ द्यावे, कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, मोफत लसीकरण तत्काळ करण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी गुंडे यांना देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस लीलाधर पाथोडे, सहसचिव आशिष रामटेके, अखिल भारतीय जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष पी.जी. शहारे, ग्रामसेवक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन उपस्थित होते.