महात्मा फुले वॉर्डातील रहिवाशांना जमिनीचे पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:47+5:302021-02-14T04:26:47+5:30
तिरोडा : शहरातील महात्मा फुले वॉर्डात मागील ५० वर्षांपासून नागरिकांचा अधिवास आहे. मात्र हा परिसर झुडपी जंगलात मोडतो. त्यामुळे ...
तिरोडा : शहरातील महात्मा फुले वॉर्डात मागील ५० वर्षांपासून नागरिकांचा अधिवास आहे. मात्र हा परिसर झुडपी जंगलात मोडतो. त्यामुळे येथील नागरिकांना पट्टे मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन बुधवारी (दि.१०) महात्मा फुले वॉर्डातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी अजयकुमार नाष्टे यांना दिले.
शहरातील महात्मा फुले वॉर्ड झुडपी जंगल परिसरात मोडतो. येथे नागरिकांचे वास्तव्य मागील ५० वर्षांपासून आजतागायत आहे. नागरिक झोपड्या तयार करून तर काहींनी मातीची घरे तयार केली आहेत. ती घरे आता अतिशय जीर्ण झाली आहेत. येथील बहुसंख्य नागरिक हे बीपीएल गटातील आहेत. बीपीएलधारकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजनांचा नगर परिषदेने लाभ सुद्धा दिला आहे. सिमेंटचे रस्ते, नाल्या, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची सोय, समाजमंदिर, समाजभवन तथा शौचालय निर्माण केले आहेत. परंतु हे क्षेत्र झुडपी जंगल परिसरात मोडत असल्याचे सांगून आवास योजनेचा लाभ देताना शासन-प्रशासन येथील नागरिकांना वंचित ठेवत आहे. सध्या केंद्र आणि राज्यस्तरावरून घरकुलाची योजना कार्यान्वित आहे. या योजनेचा लाभ घेण्यास आणि नगर परिषदेला देण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांनी पट्टे मिळावे यासाठी मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.त्यांनी तीन महिन्यांत समस्या मार्गी लागेल असे बोलून त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्यानंतर सतत उपविभागीय अधिकाऱ्यांची होणारी बदली व जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा याच दरम्यान बदली झाल्यामुळे हे प्रकरण "जैसे थे” च्या स्थितीत राहिले. फुले वॉर्डातील रहिवासी आजही पट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहेत. शिष्टमंडळात स्वप्नील शहारे, बाबुलाल किरणापुरे, रवी कडव, शिगेश ढबाले, मोरेशवर सोनेवाने, जगदीश कोसरे व इतर नागरिक उपस्थित होते. आपण स्वतः या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, असे उपविभागीय अधिकारी नाष्टे यांनी सांगितले.