अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 09:17 PM2019-03-03T21:17:14+5:302019-03-03T21:17:36+5:30
अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाच्यावतीने उपविभागीय अधिकारी रविंद्र राठौड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
वन अधिकारी कायदा २००६ ते २००८ अंतर्गत दाखल शेतीच्या जमिनीवर अतिक्रमणधारकांना तत्काळ जमिनीचे पट्टे देण्यात यावे व ज्यांना पट्टे देण्यात आले त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, मनरेगा कायद्यांतर्गत ग्रामीण बेरोजगारांना एक कुटूंबातील दोन लोकांना काम देण्यात यावे, कामात ४०० रुपये मजूरी देण्यात यावी व प्रत्येक आठवड्यात वेतन देण्यात यावे, ग्रामीण बेरोजगारांचे पलायन थांबविण्यात यावे. प्रत्येक गरजू कुटूंबाला वाढत्या महागाईला पाहता ५ लाख रुपयांचे घरकूल बनवून देण्यात यावे, निराधारांसाठी मानधन नको कायदा करण्यात यावा, १००० रुपये मानधन दरमहा देण्याची चोख व्यवस्था करण्यात यावी व निराधाराची ६५ वर्ष ऐवजी ६० वर्षाची अट निश्चित करण्यात यावी, सर्व रेशनकार्डधारकांंना ३५ किलो रेशन स्वस्त दरात देण्यात यावे, दुकान गाळे वाटपात झालेल्या भ्रष्ट कारभाराची तत्काळ चौकशी व दोषीवर कडक कार्यवाही करावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर, राणी दुर्गावती चौकात जाहीर सभा घेण्यात आली. त्यात सर्वप्रथम काश्मिरच्या पुलवामामध्ये झालेल्या आंतकवादी हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. नंतर सभेला शेखर कनोजिया शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव यांनी संबोधीत केले. अध्यक्षस्थानी बाबुराव राऊत होते.
संचालन समीर उजवणे यांनी केले. आभार संजय लांडेकर यांनी मानले. मोर्चा आंदोलनासाठी शकील शेख, प्रेमदास चौरे, रेखा ताराम, सूरजा सयाम, पुष्पा परतेकी, जाफर रहिम शेख, लालदास चवरे, मोतीराम रहिले यांच्यासह युनियनच्या सदस्यांनी सहकार्य केले.