जुन्या उड्डाणपुलाचा अहवाल १० जुलैपर्यंत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:34 PM2018-08-01T22:34:32+5:302018-08-01T22:35:40+5:30
शहरातील गोंदिया-बालघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याच विषयावर बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, .......
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याच विषयावर बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागाने संयुक्तपणे पुलाचे सर्व्हेक्षण करुन १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपुलाच्या बांधकामाला बरीच वर्षे झाली आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला असून पुलाला ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक परिसरातील पुलाचा भाग केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी सुरु ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दिले. त्यानंतर शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली. मात्र आ.गोपालदास अग्रवाल यांनी जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरवासीयांची कोंडी होण्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावकरुन जुन्या उड्डाणपुलावरुन दुचाकी आणि चारचाकी हलक्या वाहनाना प्रवेश देण्याची मागणी केली. अग्रवाल यांची मागणी प्रशासनाने तुर्तास मान्य केली. मात्र रेल्वे विभाग जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरु ठेवण्यास अनुकुल नाही. वाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी रेल्वेकडून जिल्हा प्रशासनावर दबाव वाढविला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१) या विषयावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक बोलविली.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला जुन्या उड्डाणपुलावरुन हलकी वाहनाची वाहतूक सुरू ठेवणे योग्य आहे का असा सवाल केला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी हलक्या वाहनाची वाहतूक सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले. मात्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली. तसेच एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ञ चमूने पुलाचे बारीक सर्वेक्षण करुन आणि सर्व तांत्रिकबाबीची पडताळणी करुन १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जुन्या उड्डाणपुला संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सांगितल्याची माहिती आहे.