दारु विक्रेत्यांकडून दंड घेण्याचा अधिकार द्या
By admin | Published: May 28, 2017 12:12 AM2017-05-28T00:12:36+5:302017-05-28T00:12:36+5:30
तंटा उद्भवण्याला मुख्य कारण दारु असते. या दारुलाच संपुष्टात आणले तर तंटे उद्भवण्याचे प्रमाण अत्यल्प होईल.
तंटामुक्त समित्यांची मागणी: दारूमुळेच उदभवतात बहुतांश तंटे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तंटा उद्भवण्याला मुख्य कारण दारु असते. या दारुलाच संपुष्टात आणले तर तंटे उद्भवण्याचे प्रमाण अत्यल्प होईल. यासाठी अवैध दारुवर अंकुश घालण्या बरोबर व्यसनमुक्त गावाची संकल्पना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी मांडली. गावात अवैध दारूविक्रत्येंना दंड करण्याचा अधिकार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व महिला दारूबंदी समितीला देण्याची मागणी होत आहे.
काही गावांनी ग्राम पंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला. परंतु अजूनही अनेक गावातील ग्राम पंचायतचे पदाधिकारी दारूविक्रेत्यांना सहकार्य करीत आहेत. गावात अवैध दारू विक्री करताना पकडण्यात आलेल्या व्यक्तीकडून दंड स्वरूपात रक्कम वसूल करून ती रक्कम गावाच्या विकासासाठी लावण्याचा अधिकार देण्यात यावे अशी मागणी होत आहे. गावागावातील अवैध दारू विक्रेत्यांची दारू पकडण्यासाठी महिला रात्रीच्या वेळी जागतात. दारूविक्री करताना पकडलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर पोलिस पैसे घेऊन त्यांना सोडून देतात. अवैध दारूविक्रेत्यांनी पकडलेली ही रक्कम पोलिसांच्या खिशात जाऊ नये यासाठी ती रक्कम वसूल करून गावविकासाठी ग्राम पंचायतमध्ये जमा करण्यात यावी व ती रक्कम गावाच्या विकासाठी खर्च करण्यात यावी अशी मागणी महिला मंडळींची आहे.
पुरस्कारानंतर व्यसनमुक्तीच्या प्रोत्साहनाकडे पाठ
तंटामुक्त गाव मोहीमेचा पुरस्कार घेईपर्यंत तंटामुक्त समित्या अत्यंत जोमात होत्या. त्यांनी गावातील व्यसनमुक्त नागरिकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ३०० देण्याचे ठरले होते. जो व्यक्ति दारु सोडेल व ६ महिन्याच्या काळात दारु घेणार नाही त्याला प्रोत्साहन अनुदान म्हणून ३०० रुपये देण्याचा पायंडा जिल्ह्यातील अनेक गावांनी रोवला होता. गुन्हेगारीची आकडेवारी पाहता सामान्य व्यक्तिीच्या भांडणापैकी दारुमुळे घडलेले वाद अधिक असल्याने दारुवर समूळ उपचार म्हणून ग्रा. पं. बचतगट, दारुबंदी समिती, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने अवैध दारु बंद करण्यात आली. दारु विकणाऱ्यास दंड ठोठावून विकणाऱ्याची माहिती देणाऱ्यास पुरस्कार दिले होते. आता व्यसन सोडणाऱ्याला तंटामुक्त गाव समित्यांकडून प्रोत्साहन मिळत नसल्याचे चित्र उभे आहे.