दवनीवाड्याला तालुक्याचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:02 AM2018-02-23T00:02:04+5:302018-02-23T00:03:06+5:30

तिरोडा आणि गोंदिया तालुक्याच्या टोकावर असलेले सर्वात मोठे गाव दवनीवाडा. या गावाला तहसील कार्यालय व पंचायत समिती देवून तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी गेल्या २२ वर्षांपासून केली जात आहे.

Give the status of taluka to Dahanwad | दवनीवाड्याला तालुक्याचा दर्जा द्या

दवनीवाड्याला तालुक्याचा दर्जा द्या

Next
ठळक मुद्दे२२ वर्षांपासून रखडली मागणी : कृती समितीचे आमदारांना निवेदन

ऑनलाईन लोकमत
काचेवानी : तिरोडा आणि गोंदिया तालुक्याच्या टोकावर असलेले सर्वात मोठे गाव दवनीवाडा. या गावाला तहसील कार्यालय व पंचायत समिती देवून तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी गेल्या २२ वर्षांपासून केली जात आहे. मात्र आजही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. आता या मागणीच्या पूर्ततेसाठी आमदार विजय रहांगडाले यांना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.
इंग्रज राजवटीत जनतेच्या सुविधेकरिता ९६ गावांच्या मध्यभागी दवनीवाडा येथे पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिरोडा व गोंदिया तालुक्यांच्या ठिकाणी जनतेला आपले कामे करण्यासाठी त्रास व वेळ अधिक लागत होते. त्यामुळे दवनीवाडा येथे तहसील व पं.स. कार्यालय स्थापित करुन तालुक्याचा दर्जा द्यावा. याकरिता सर्व राजकीय पक्षांचे नामदार, खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिला होता.
दवनीवाडा येथे तहसील कार्यालय व पं.स. कार्यालय किती गरजेचे आहे, हे मुंबई व नागपूर विधानसभेच्या वेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व करुन समजविण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी व इतर मंत्र्यांनी तहसीलचा दर्जा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
आमदार रहांगडाले यांना दिलेल्या निवेदनात तालुका व पंचायत समिती निर्माण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भंडारा जिल्हा परिषदेच्या सभेत (ठराव क्र. २३ दि.५ नोव्हेंबर १९९६) पहिला ठराव घेण्यात आला होता. पंचायत समिती तिरोड्याच्या सभेत (ठराव क्र. १२ दि. ६ जून १९८५) दुसरा ठराव घेण्यात आला होता. तसेच पंचायत समिती गोंदिया येथे (ठराव क्रमांक १३ दि. ६ सप्टेंबर २००५) तिसरा ठराव घेण्यात आला होता.
तिन्ही ठराव सर्वानुमते पारित करुन शासनास देण्यात आले होते. राज्यात नवीन तालुके व पं.स. तयार करताना प्रत्येक वेळी मागणी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, आजही त्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. निवेदनानुसार, महाराष्टÑ शासनाने जिल्हाधिकारी गोंदियामार्फत माहिती व तालुका तयार करण्याकरिता आवश्यक तपशील मागितला. जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती व तपशील पाठविला. तरीपण आजपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांना १८ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले. या वेळी सरपंच नरहरप्रसाद मस्करे, राजेश उरकुडे, निरज सोनेवाने, बंठी श्रीबांसुरी, भैयालाल सूर्यवंशी, रोशन चौधरी, शफी शेख, नेहरू उपवंशी, मंडेले व स्वरूप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.
पालघर जिल्ह्याची निर्मिती, मग दवनीवाडा का नाही?
१ आॅगस्ट २००२ पासून लोकसभा, विधानसभा संघाच्या परिसिमनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय घटकांची पुनर्रचना करुन नवीन प्रशासकीय घटक निर्माण करण्यास केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या परिसिमन आयोगाची बंदी घातल्याने दवनीवाडा नवीन तालुका निर्माण करता येत नाही, असे पत्र दिले. मात्र या उलट २०११ ते २०१२ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व दवनीवाड्याच्या प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला. त्यामुळे या पक्षपातबद्दल जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तारांकित प्रश्नातून मुद्दा उचलणार
आमदार विजय रहांगडाले येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे दवनीवाडा तालुक्याचा प्रश्न उपस्थित करणार आहेत. तसेच जनतेला न्याय मिळवून देणार, असे आश्वासन दिल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले. यापूर्वीसुद्धा दवनीवाडा तालुक्यासाठी प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते, असे आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले. तारांकित प्रश्नासंबंधी पत्र मुख्यमंत्री यांना (पत्र जा.क्र. विभर/ति६४/५११/२०१८ दि. १८ फेब्रुवारी २०१८) पाठविण्यात आला आहे.

Web Title: Give the status of taluka to Dahanwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.