शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:47+5:302021-04-17T04:28:47+5:30
नवेगावबांध : जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. इयत्ता पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे प्रत्यक्ष वर्ग मागेच ...
नवेगावबांध : जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. इयत्ता पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे प्रत्यक्ष वर्ग मागेच बंद करण्यात आले. दहावी व बारावीचे सुरू असलेले वर्गही बंद करण्यात आले आहेत. अशात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमित शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासात शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षकांना वर्क फ्राम होमची सवलत देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
जिल्ह्यात काही शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे. मात्र शिक्षण विभागाने शाळा लॉकडाऊनमध्ये शाळा सुरू ठेवाव्यात की बंद ठेवाव्यात याबाबत स्पष्ट आदेश काढले नसल्यामुळे शाळेत जायचे की घरूनच वर्क फ्रॉम होम करायचा की, पन्नास टक्के उपस्थिती ठेवायची. याबाबत स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण विभागाने याबाबत स्पष्ट आदेश काढावा व शिक्षकांना कोरोना संसर्गापासून वाचवावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आपल्याला संसर्ग तर होणार नाही ना? अशी भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. शाळेत जाणे म्हणजे गर्दी करणे असाच प्रकार आहे. एखादा शिक्षक जर कोरोना बाधित असेल, तर त्याच्यापासून इतर शिक्षक व कर्मचारीही बाधित होऊ शकतात. इकडे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेत येऊ नये घरूनच होम फ्रॉम वर्क किंवा ५० टक्के उपस्थिती ठेऊन शालेय कामकाज सुरू ठेवावे. असे शिक्षण अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश नसल्याचे मुख्याध्यापक सांगत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक वर्ग सुद्धा संभ्रमात आहे. इयत्ता दहावी, बारावी तसेच सर्व वर्ग बंद असल्यामुळे शाळेत गर्दी करण्यापेक्षा व कोरोनाचा संसर्ग ओढवून घेण्यापेक्षा वर्क फ्रॉम होमची सवलत शिक्षण विभागाने द्यावी. अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केली आहे.