‘त्या’ आरोपींना फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:56 PM2018-03-23T22:56:01+5:302018-03-23T22:56:01+5:30
देवरी तालुक्यातील ग्राम फुटाणा येथील कलार समाजाच्या देशमुख कुटुंबातील २० वर्षीय युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम फुटाणा येथील कलार समाजाच्या देशमुख कुटुंबातील २० वर्षीय युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना १७ मार्च रोजी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील पंचायत समिती परिसरात घडली. या घटनेचा जिल्हा युवा कोसरे कलार समाज संस्थेने निषेध केला असून घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देवून न्याय देण्याची मागणी केली आहे.
मयंक उर्फ गोलू देशमुख रा. किन्ही-बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा असे त्या नराधम आरोपीचे नाव असून तो लाखणी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तसेच तो साकोली येथील ट्रॅक्टर कंपनीत नोकरीवर होता. सदर युवतीवर मध्यरात्रीदरम्यान अमानुषपणे अत्याचार करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. यानंतर २० मार्च रोजी मयंकच्या भाड्याच्या खोलीत कुजलेल्या स्थितीत त्या युवतीचा मृतदेह परिसरातील नागरिकांना आढळला. या घटनेत आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता कलार समाजाने व मृत युवतीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
या अमानविय घटनेबद्दल कलार समाजात रोष व्याप्त आहे. आरोपी मयंक देशमुख याला त्वरित अटक करण्यात यावे, इतर आरोपींचा त्वरित शोध घेवून त्यांनाही अटक करावी व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कोसरे कलार समाज संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री फडवीस, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच आरोपींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्ववर्गीय कलार समाजाने दिला आहे.
निवेदन देताना कोसरे कलार समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष तिर्थराज उके, जिल्हा सहसचिव उमेश शहारे, दिनेश फरकुंडे, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, नर्बद मेश्राम, प्रशांत तांडेकर, डी.एम. दखने, ऋषी उके, अविनाश मेश्राम, विजयकुमार कावळे, कुणाल चौरागडे, भुवनलाल देशमुख, पुरणचंद मेश्राम, रविंद्र कावळे, संजय शेंडे, संतोष मेश्राम, एस.बी. मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.