शहरातील मजुरांच्या हाताला काम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:12+5:302021-07-04T04:20:12+5:30
गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाळी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ...
गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाळी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे. पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, पाच महिन्यात संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र अजूनही काही गावात व्यायामशाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहे. मात्र भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे़ त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे विभागाकडून मागील १० ते १५ वर्षांपूर्वी अनेक रेल्वेमार्गावर बोगद्याचे काम सुरू आहे. पण हे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
गावागावातील हातपंप नादुरुस्त
गोंदिया :गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत. मात्र, ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता उन्हाळा चांगलाच तापायला सुरुवात झाली असून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.
सांडपाणी रस्त्यावर
गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते.
बंधारा असूनही उपयोग नाही
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम राका-सौंदड मार्गावरील चूलबंद नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, त्याचा काहीच उपयोग घेतला जात नाही. त्यामुळे हा बंधारा शेतकऱ्यांसाठी नाममात्र ठरत आहे.
वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक
अर्जुनी-मोरगाव : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. अनेकदा अशी वृक्षतोड करताना वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव: गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र आता अनुदान जमा झालेले नाही.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकलगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधीसुद्धा पसरते. लोकांना नाक दाबून येथून ये-जा करावी लागते.
शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे
केशोरी : अलीकडे महावितरण कंपनीच्या भरमसाट दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीज बिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्राकडे वळत आहेत.
राईस मिल ठरत आहेत धोकादायक
गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मिलमुळे वाहन चालकांच्या डोळ्यात धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यात कचरा जाऊन अपघात होण्याची शक्यता असते.