सावली देतेय वृद्ध निराधारांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:08+5:302021-07-04T04:20:08+5:30
गोंदिया : ज्यांना इतरांनी नाकारले त्यांना सावलीने सावरले, ज्या वृद्धांना स्वत:च्या पोराने म्हातारपणी त्यांची काठी न होता नाकारून ...
गोंदिया : ज्यांना इतरांनी नाकारले त्यांना सावलीने सावरले, ज्या वृद्धांना स्वत:च्या पोराने म्हातारपणी त्यांची काठी न होता नाकारून घरातून हाकलले, तेव्हा अशा वृद्ध भिकारी, बेघर निराधारांसाठी गोंदियातील सावली केंद्र मदतीला धावून येत आहे. या केंद्रातील कर्मचारी भिकारी, निराधारांच्या शोधात असतात. आतापर्यंत सावलीने हजारो निराधारांना अन्न, वस्र, निवाराच नव्हे तर रोजगार, आरोग्य, मृतकांवर आपल्या आईवडिलांप्रमाणे अंत्यसंस्कार केलाय एवढेच नव्हे तर बेघरांना आश्रयाची सावली देत आहे.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें; तो चि साधृू ओळखावा, देव तेथे चि जाणावा..... हा अभंग सर्वच ऐकतात मात्र,याचा प्रत्यक्ष जीवनात फार कमी जण अवलंब करतात. आपण कुत्र्या-मांजरांचेही लाड करतो, त्यांची काळजी घेतो. पण त्यांना मिळतो तसा साधा तुकडाही ज्यांच्या वाट्याला येत नाही, रस्त्याच्या कडेला भीक मागणाऱ्यांचे पहिले दर्शन होते. अशा भिकाऱ्यांची अवस्था पाहून त्यांना कधी ‘अच्छे दिन’ येतील काय, हा प्रश्न निर्माण होतो. वृद्धापकाळी पोटच्या गोळ्याने नाकारले बेघर वृद्ध, निराधार आणि भिकाऱ्यांसाठी आता गोंदियातील सावली मदत केंद्र धावून आला आहे. या सावलीने आतापर्यंत हजारो बेघरांना सावली दिली आहे. आतापर्यंत सावलीने शेकडो भिकारी, निराधार, वृद्धांना आपल्या मायेची ऊब देत त्यांना अन्न, वस्र, निवाराच नव्हे तर रोजगार देत अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा मिळवून दिले. एवढेच नव्हे तर आयुष्याच्या अंतिमसमयी पोटच्या गोळ्याने त्यांचे तोंड पाहिले नाही, त्यांच्यावर अंत्यसंस्कारसुद्धा सावलीच्या स्वंयसेवकांनी केले. भिकाऱ्यांना निवारा उपलब्ध करून देत त्यांना स्वंयरोजगाराचे धडे सुध्दा देण्याचा प्रयत्न सावलीच्या माध्यमातून केला जात आहे.
........
भिकारीमुक्त शहराचा संकल्प
गोंदियात आज शहराच्या कोणत्याही रस्त्याने जा किंवा चौकात जा, गाडी थांबताच हात पुढे करणारी लहान मुलं, कडेवर मूल असलेल्या स्त्रिया, वृद्ध नजरेस पडतात, कुणी त्यांच्या हातावर काही देतं, कुणी दुर्लक्ष करतं, कुणी खेकसून पुढे निघून जातो. चौका-चौकांत सिग्नलवर एक वेळ पोलीस दिसणार नाहीत पण भिकारी हमखास दिसतात. वास्तविक कायद्याने भीक मागणे गुन्हा आहे, पण अनेक कायदे केवळ कागदावर असतात तसाच हाही एक कायदा आहे. त्यामुळे कायदे कागदावर व भिकारी रस्त्यावर अशी सध्याची स्थिती आहे. मात्र सावलीने भिकारीमुक्त शहर करण्याचा विडाच उचलला असल्याचे सावलीचे प्रकल्प अधिकारी धनराज बनकर यांनी सांगितले.
.................
कोट
सावलीने आता वृद्ध, भिकारी, बेघरांना संस्कारांचे धडे देत सकाळी योगा, स्वच्छता, वृक्षलागवड, मनोरंजन इ. बाबीची पूर्तता करीत आयुष्याच्या सरत्यासमयी त्यांचे उर्वरित आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे.
- मोहन, लाभार्थी
.............