ध्वजारोहण करुन नवरदेवाने वाढविली महाराष्ट्राची शान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:58 PM2018-05-02T23:58:45+5:302018-05-02T23:58:45+5:30
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! संकट देशा ! कणखर देशा...असा सार्थ अभियान असलेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा सोहळा, अर्थात महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता बाळगणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करीत ध्वजारोहण करुन महाराष्ट्राला नतमस्तक होवून मानवंदना दिली.
संजयकुमार बंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! संकट देशा ! कणखर देशा...असा सार्थ अभियान असलेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा सोहळा, अर्थात महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता बाळगणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करीत ध्वजारोहण करुन महाराष्ट्राला नतमस्तक होवून मानवंदना दिली. महाराष्ट्र दिनाचा एक अविस्मरणीय प्रसंग अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायत येथे पहावयास मिळाला. येथील हितेश फुलबांधे या युवकाने (नवरदेवाने) महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण प्रसंगी उपस्थिती दर्शवून नंतर लग्न मंडपाकडे प्रयाण करीत महाराष्ट्राची शान वाढविली.
ग्रामपंचायत महागाव येथे महाराष्ट्र दिनाच्या ५८ व्या वर्धापन दिनी प्रशासक अनुपकुमार भावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महागाव येथील युवक हितेश फुलबांधे यांचे भंडारा जवळील खुर्शीपार येथे दुपारी ११.३० वाजता लग्न होते. लग्नासाठी निघालेली वरात, बँडबाजा वाद्यासहित ग्रामपंचायत समोरुन जात असताना ग्रामपंचायतमधील ध्वजारोहणचा कार्यक्रम पाहुन नवरदेवाने बँडबाजा बंद करुन प्रत्यक्ष ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होवून आपल्या अंगी असलेल्या राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला. त्यांचे हे राष्ट्रहिताचे कर्तव्य बघून वरातीतील वऱ्हाडी मंडळीने ध्वजारोहणाला उपस्थिती दर्शविली. ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग लग्न’ या महाराष्ट्राच्या इतिहासाची पुन्हा नव्याने या प्रसंगाने प्रचिती आली. ध्वजारोहणाप्रसंगी ग्रामविकास अधिकारी एम.बी. वाघमारे, ग्रा.पं. सदस्य लोणारे, साखरे, श्रीमती रामटेके, नरवीश पटेल, आशा मखरे, पोलीस पाटील भागवत झोळे, लिपिक नेवारे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्राबद्दल असलेल्या प्रेमाची प्रचिती नवरदेव हितेश फुलबांधे व वरातीतल सहभागी वऱ्हाडी मंडळीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.