‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:25 AM2017-10-23T00:25:23+5:302017-10-23T00:25:41+5:30
सन २०१६-१७ मध्ये संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेल्या उपजिल्हा रूग्णालयाने अनेक बाबीत उपलब्धी मिळविली आहे.
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २०१६-१७ मध्ये संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेल्या उपजिल्हा रूग्णालयाने अनेक बाबीत उपलब्धी मिळविली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या ‘शून्य माता मृत्यू’ अभियानाचीसुद्धा तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाने ६ महिन्यांत (अर्धवार्षिक) धोकादायक स्थितीत असलेल्या ८७ प्रसूती सिझेरियनद्वारे यशस्वी करून उद्दिष्टपूर्ती केली आहे.
विशेष म्हणजे, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात त्यांच्या वैद्यकीय चमूने परिश्रम घेवून कायाकल्प कार्यक्रमात महाराष्टÑ राज्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. त्याबद्दल नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. जे.पी. नड्डा यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी रोजी त्यांचा व त्यांच्या चमूचा गौरव करण्यात आला. तसेच मुंबई येथे महाराष्टÑ राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्तेसुद्धा १० जुलै रोजी पुरस्कृत करण्यात आले.
यानंतर तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात १ एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सहा महिन्यांच्या कालावधीत सिझेरियनद्वारे धोकादायक असलेल्या ८७ यशस्वी प्रसूती सुरक्षिरित्या करण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी सुरू केलेल्या ‘शून्य माता मृत्यू’ अभियानाची उद्दिष्टपूर्ती या सहा महिन्यांत सदर रूग्णालयाच्या चमूने करून दाखविली. तसेच सदर अभियान पुढेही यशस्विरित्या राबविण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक व त्यांची चमू परिश्रम घेत आहे. कोणत्याही मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होवू नये व नवजात बाळही सुरक्षित असावे, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.
विविध प्रकारच्या २८६ रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, नागपूर, पुणे येथील तज्ज्ञांकडून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील टेलिमेडिसिन सेंटरच्या माध्यमाने उपचार करण्यात आला. यासाठी टेलिमेडिसिन सेंटरचे संचालक कमलेश शुक्ला यांनी सहकार्य करीत विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला रूग्णांना मिळवून दिला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम व त्यांच्या चमूच्या परिश्रमामुळेच सातत्याने पाच वेळा जिल्ह्यातून डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम क्रमांकाचे पुरस्कार तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाला मिळाले.
५८ कुपोषित बालकांवर उपचार
१ एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील बाल उपचार केंद्रात ५८ कुपोषित बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आला. त्यामुळे त्या बालकांची वजनवाढ होवून शारीरिक विकासात भर पडली. तसेच मोतीबिंदूच्या ११९ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्रदान करण्यात आली. तसेच काही रूग्णांना इतर डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत व डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकाºयांनी सुरू केलेले ‘शून्य माता मृत्यू’ अभियान पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आम्ही पूर्ण परिश्रम घेत आहोत. याचीच फलश्रुती म्हणजे मागील सहा महिन्यांत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात एकाही मातेचा मृत्यू झाला नाही. प्रसूत माता व नवजात बाळ यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
डॉ. हिंमत मेश्राम,
वैद्यकीय अधीक्षक,
उपजिल्हा रूग्णालय, तिरोडा.