देवही पाळतोय कोरोनाविषयक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:52 AM2021-03-13T04:52:56+5:302021-03-13T04:52:56+5:30
वडेगाव : कोरोना संसर्गाची भीती आता देवालाही जाणवू लागल्याचा प्रत्यय गुरुवारी (दि. ११) महाशिवरात्रीनिमित्त अनुभवास मिळाला. कोरोना संसर्गामुळे महाशिवरात्रीनिमित्त ...
वडेगाव : कोरोना संसर्गाची भीती आता देवालाही जाणवू लागल्याचा प्रत्यय गुरुवारी (दि. ११) महाशिवरात्रीनिमित्त अनुभवास मिळाला. कोरोना संसर्गामुळे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित सर्वच यात्रांवर प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र, भक्तांना देवाचा मोह आवरता आला नाही व ते देवाच्या दारी पोहोचले. मात्र, चक्क देवानेच कोरोनाविषयक निर्बंध पाळल्याने भक्तांना बंद दारासमोर पूजा करून परतावे लागले.
महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी आयोजित यात्रास्थळी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुजारी आणि पूजेचे साहित्य विकणारेही उपस्थित होते; पण यावेळी भक्तांना मात्र मंदिरात प्रवेश नव्हता. यात्रास्थळी भाविकांनी दरवर्षीप्रमाणे गर्दी केली खरी; परंतु पोलीस प्रशासनाकडून वाहन व दुकानांना यात्रास्थळी प्रवेश नव्हता. त्यामुळे अनेक दुकानदारांना आपले दुकान यात्रास्थळापासून लांबच रस्त्याशेजारी थाटावे लागले, तर यात्रेकरूंनाही आपले वाहन लांब अंतरावर पार्क करून यात्रास्थळी जावे लागत होते. शासनाच्या विविध विभागांकडून पुरविल्या जाणाऱ्या सेवासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पुरविण्यात आल्या नव्हत्या. आरोग्य विभागाकडून यात्रास्थळी प्राथमिक उपचाराची सोय असो वा एसटी महामंडळाकडून भक्तांसाठी पुरविली जाणारी विशेष बससेवाही यावेळी उपलब्ध नव्हती. भक्तांना मंदिरात प्रवेश नव्हता; मात्र मंदिर समितीचे देणगी स्थळ व दानपेट्या या दोन्ही मंदिराबाहेर काढण्यात आल्या होत्या आणि येथे मात्र कोणतेही शारीरिक अंतर न पाळता दान देण्याचे पुण्य राजरोसपणे मिळविले जात होते, हे येथे विशेष उल्लेखनीय.