डॉक्टरांच्या रुपातून देव भेटला; जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 04:23 PM2024-08-14T16:23:55+5:302024-08-14T16:24:52+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपचार : दिवसाकाठी ५०० रुग्ण करतात उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खासगी वैद्यकीय सेवा आवाक्याबाहेर असल्याने गोरगरीब रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतात. जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत असल्याने गरिबांसाठी मोठा आधार होत आहे. नोंदणीचे नाममात्र शुल्क वगळता तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सेवा मिळत असल्यामुळे डॉक्टरांच्या रूपातून आम्हाला देव भेटला, अशी भावना रुग्णांच्या नातेवाइकांची आहे.
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार, तसेच बहुतांश आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असल्याने दररोज बाह्यरुग्ण विभागात सरासरी ५०० रुग्णांची नोंदणी होत आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमुळे गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने रुग्णांचा ओढा आणि विश्वास वाढला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात रोज ५०० जणांवर उपचार
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ५०० रुग्णांची नोंदणी होते. तसेच आंतररुग्ण विभागात सरासरी ४०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू असतात.
६० जणांवर रोज उपचार
- रस्ते अपघातात गंभीर जखमी, अन्य घटनांतील गंभीर मार लागलेल्या रुग्णांना येथील रुग्णालयात पाठविले जाते.
- अपघात विभागात दाखल झालेल्या गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार, गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येतात.
हे तर आमचे कर्तव्य
"रुग्णसेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. येथील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात."
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधिष्ठाता, गोंदिया
डॉक्टरमुळेच पोरगी वाचली
"रस्ते अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली होती. गंभीर मार लागल्याने ती बेशुद्ध होती. तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या
प्रयत्नांनी ती बचावली."
- सिंधू मेंढे, किडंगीपार
शासकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
"माझ्या आईचा उजवा पाय फॅक्चर झाल्याने दोनदा खासगी रुग्णालयांत शस्त्रक्रिया केली. मात्र, त्रास कमी झाला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आईला आता आराम मिळाला आहे."
- रवींद्र राऊत, रुग्णाचा नातेवाईक.