पितृपक्षातही सोने-घर खरेदी जोरात; वाहनखरेदीसाठी मात्र आहे वेटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 11:02 PM2022-09-25T23:02:55+5:302022-09-25T23:03:41+5:30

आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागील समज आहे. यंदा १० ते २५ सप्टेंबरदरम्यान पितृपक्ष आहे. या कालावधीत पूर्वी हिंदू धर्मातील बहुतांश नागरिक सोने, चांदी, घर, वाहन या नवीन वस्तूंची खरेदी करीत नव्हते, इतकेच नव्हे तर नवीन कपडे, चप्पलसुद्धा खरेदी करण्याचे टाळत होते; पण आता तसे काही राहिले नाही.

Gold-house buying is booming even in Pitrupaksha; But there is waiting for vehicle purchase! | पितृपक्षातही सोने-घर खरेदी जोरात; वाहनखरेदीसाठी मात्र आहे वेटिंग!

पितृपक्षातही सोने-घर खरेदी जोरात; वाहनखरेदीसाठी मात्र आहे वेटिंग!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रूढी, परंपरेनुसार पितृपक्षात आधी खरेदी केली जायची नाही. मात्र, आता हे पाळले जात नाही. सोन्याचे दर कमी झाल्याने ही खरेदी वाढली असतानाच स्टील, सिमेंटचे दर कमी झाल्याने घरांची खरेदीदेखील जोरात सुरू आहे. याशिवाय वाहने खरेदीवरही भर दिला जात आहे, यावरून असे दिसून येते की, पितृपक्षाच्या रूढी, परंपरेला फाटा देत, या पंधरवड्यात आता नवीन वस्तूंचीही खरेदी केली जात आहे. गणपती विसर्जनानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो.
भाद्रपद महिन्यातील ‘कृष्णपक्ष’ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागील समज आहे.
यंदा १० ते २५ सप्टेंबरदरम्यान पितृपक्ष आहे. या कालावधीत पूर्वी हिंदू धर्मातील बहुतांश नागरिक सोने, चांदी, घर, वाहन या नवीन वस्तूंची खरेदी करीत नव्हते, इतकेच नव्हे तर नवीन कपडे, चप्पलसुद्धा खरेदी करण्याचे टाळत होते; पण आता तसे काही राहिले नाही.

 सोन्याचे भाव कमी  झाल्याने खरेदी 

ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरीपासून सोन्याचे दर कमी झाले आहेत. या दीड महिन्यात सोन्याचे दर ५० हजारांच्या आसपास घिरट्या घालीत आहेत. सोन्याचा दर ५१ हजार रुपये प्रति तोळ्याच्या घरात आहे. पितृपक्षातही हे दर कायम असल्याने सोन्याची खरेदी बरीच वाढली असल्याचे दिसून येते.

पितृपक्षात घर-प्लॉटचे व्यवहार
आता बहुतांश लोक रूढी, परंपरेला विशेष महत्त्व देत नसल्याचे दिसून येते. पितृपक्षातही नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी धडपड करीत आहेत. यामुळे घर-प्लॉटचे व्यवहार सुरूच आहेत.

चारचाकीसाठी वेटिंग
- बहुतांश व्यक्तींचे आकर्षक गाडी घेण्याचे स्वप्न असते आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक गाड्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. काही लोक आकर्षक गाड्यांचे वेडे असतात. यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदीसाठी आतापासूनच बुकिंग करून वेटिंगवर असतात, तर काही जण खरेदीसुद्धा करतात.

व्यापारी काय म्हणतात?

या विज्ञान युगात पितृपक्षाच्या पंधरवड्याला विशेष महत्त्व राहिले नाही. कुठे किती फायदा होईल यावर भर दिला जातो. यामुळेच सोन्याचे दर काही प्रमाणात कमी होताच गुंतवणूकदार व इतरही मंडळी पितृपक्षातही सोने खरेदी करीत आहेत, तर काही मंडळी दसऱ्याच्या शुभमुहूर्तासाठी ऑर्डर देत आहेत. 
- हिमान वस्तानी, सराफा व्यावसायिक

तसे पाहता दिवाळीनंतरच घर-प्लॉटच्या व्यवहाराला गती दिली जाते; पण सध्या बांधकामाच्या काही साहित्यांचे दर कमी झाल्याने पितृपक्षातही घर-प्लॉट खरेदी करू लागले आणि दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बुकिंगही करीत आहे.
- अरविंद तिवारी, बांधकाम व्यावसायिक

या काळात खरेदी केलेले म्हणतात...

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी केली जाते; पण सध्या सोन्याचे दर कमी असल्यामुळे दसऱ्यासाठी आताच सोन्याची खरेदी करून घेतली जात आहे. वाट बघण्यात दर चढल्यास जास्त पैसे मोजावे लागतील. 
- मंसाराम चिखलोंडे, नागरिक

पितृपक्षात खरेदी केली जात नसल्याचे बोलले जाते. मात्र, आता स्पर्धा एवढी आहे की वाट बघत बसल्यास नुकसान होते. यामुळे आता पितृपक्षातही नागरिक व्यवहारांना प्राथमिकता देतात. 
- विवेक जगताप, नागरिक 

 

Web Title: Gold-house buying is booming even in Pitrupaksha; But there is waiting for vehicle purchase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं