विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई; लांजी नाक्यावर ३ कोटी ९१ लाख रुपयांचे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 07:07 PM2024-10-20T19:07:08+5:302024-10-20T19:07:24+5:30
भरारी व एसएसटी पथकाची कारवाई
राजीव फुंडे,आमगाव (गोंदिया) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर निवडणूक, पोलिस विभागाचे तपासणी नाके सुरू करण्यात आले आहे. आमगाव-लांजी मार्गावरील सीमा तपासणी नाक्यावर एका लॉजिस्टिक वाहनाची तपासणी नाक्यावर तैनात भरारी व एसएसटी पथकाने केली असता त्यात ३ कोटी ९१ लाख रुपये किमतीचे अंदाजे आठ किलो सोने आढळले. पथकाने हे सोने व वाहन जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
मध्य प्रदेश लांजी-आमगाव मार्गावर सीमा तपासणी नाका तयार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाक्यावर आमगाव मतदारसंघातील भरारी आणि एसएसटी पथक तैनात करण्यात आले आहे. या नाक्यावर दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी केली जात आहे. शनिवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास या नाक्यावर तैनात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमगाववरून जिल्हा शिवणीकडे जात असलेले लॉजिस्टिक वाहन क्र. सीजी ०४, एन २८७६ थांबवून वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान या वाहनातून अंदाजे ८ किलो वजनाचे ३ कोटी ९१ लाख किमतीचे सोने सापडले.
या प्रकाराने नाक्यावरील कर्मचारी सुद्धा अवाक् झाले. त्यांनी वाहन चालकाला सदर सोन्यासंदर्भात विचारणा केली व बिलाची मागणी केली. पण, वाहन चालकाच्या संशयास्पद हालचालीवरून कर्मचाऱ्यांनी याची माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व आमगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना दिली. माहिती मिळताच ते लांजी मार्गावरील तपासणी नाक्यावर पोहोचले. या सर्वांच्या उपस्थितीत मौका पंचनामा करून जप्त केलेला मुद्देमाल सीलबंद करण्यात आला. तसेच पोलिस संरक्षणात जप्त केलेला सर्व मुद्देमाल गोंदिया जिल्हा काेषागार कार्यालय यांच्या अभिरक्षेतील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आला. विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरची जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
यांच्या मार्गदर्शनात केली कारवाई
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तसेच यासंदर्भात ईएसएमएसमध्ये तक्रार नोंदवून या मुद्देमालाची तपासणी करून पुढील कारवाई भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
आमगाव-लांजी मार्गावरील नाक्यावर तपासणीदरम्यान एका लॉजिस्टक वाहनातून ३ काेटी ९१ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. नाक्यावर तैनात पथकाने ही कारवाई केली. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे पडताळणी करून कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
-कविता गायकवाड, उपविभागीय अधिकारी, देवरी
शिवणी येथील व्यापाऱ्याचे सोने असल्याची चर्चा
आमगाव-लांजी मार्गावरील नाक्यावर तैनात पथकाने जप्त केलेले सोने हे मध्य प्रदेशातील शिवणी येथील एका व्यापाऱ्याचे असल्याचे बोलल्या जाते. हे सोने रायपूरवरून एका लाॅजिस्टक वाहनातून वाहून नेले जात होते. संबंधित विभाग याची चौकशी करीत असून, तपासात काय ते पुढे येईल.