भाविकांच्या गर्दीने फुलले कचारगड, पाच दिवस होणार 'जय सेवा'चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 11:05 AM2022-02-15T11:05:31+5:302022-02-15T11:26:21+5:30
मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात.
विजय मानकर
गोंदिया : जिल्ह्यातील पूर्व टोकावर असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड देशभरातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून मध्य भारतासह आता देश-विदेशात प्रसिद्धीला आलेला आहे. मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात.
गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील जिल्ह्याच्या परिसरात सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्व भाग पसरलेला आहे. या भागात अनेक ठिकाणी पर्वतांमध्ये गुहा आहेत. काही अभ्यासक या परिसराला मैकल पर्वतरांगेच्या भागसुद्धा मानतात. या भागात सालेकसा तालुक्यातील कचारगड आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असून बाजूला पर्वतातसुद्धा अनेक छोटी-मोठी गुहा पहावयास मिळतात.
या गुहांमध्ये आदिवासींचे पूर्वज अदृश्य रूपात आजही वास्तव्यात आहेत, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी लोह युगात आदिवासी गोंड जमातींचे पूर्वज या गुहेत राहत असून दगडी भांडे आणि कच्च्या लोखंडाच्या साहित्यांचा वापर करीत असत. असे या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून अंदाज लावला जातो. क्षेत्रात अनेक नदी-नाले आहेत. आदिवासी समाज समृूहाने वावरत जंगलातील फळ, फुले कंदमुळे आणि प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह आणि गुहांमध्ये वास्तव्य करीत असत. हळूहळू आदिवासींची संख्या वाढत गेली आणि नंतर या ठिकाणातून आदिवासी लोक इतर भागात वास्तव्य करू लागले.
अशी आहे श्रद्धा
आदिवासी गोंड समाजाच्या धार्मिक मान्यतेनुसार माता गौराचे ३३ मानसपुत्र होते. ते मोठे उपद्रवी होते. त्यांचा उपद्रव बघून त्यांना या मोठे गुहेत डांबून दारावर मोठे दगड बंद करण्यात आले होते. आदिवासी संगीतकाराने आपले किंदरी वाद्य वाजविले. त्यामुळे त्या ३३ भावंडामध्ये उत्साह संचारला आणि दारावरील दगडाला धक्का दिला. ते गुहेतून मुक्त होऊन येथून पसार झाले. वेगवेगळ्या ठिकाणी वंशवाढ करू लागले. संगीतकारचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला. वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरी त्यांचे पूर्वज मात्र कचारगड येथील असून त्यांची आत्मा अदृश्य स्वरूपात येथे असल्याची श्रध्दा आहे. त्यामुळेच आदिवासी समाजबांधव माद्य पोर्णिमेला येथे येऊन आपल्या दैवतांचे पूजन आणि पूर्वजांचे स्मरण करतात.
अशी झाली यात्रेला सुरुवात
कचारगडला जगप्रसिद्ध करण्यासाठी गोंडी संशोधक मोतीरावण कंगाले, सुन्हेरसिंह ताराम, के.बी मर्सकोल्हे, शीतल मरकाम व बी.एल कोर्राम यांनी सन १९८६ पासून धनेगाव येथून कचारगड यात्रेची सुरुवात केली. त्यावेळच्या आदिवासी विकास मंत्र्यांना पाचारण करून धनेगाव येथे गोंडीध्वज फडकावून यात्रा सुरू केली.