Gondia | हल्बीटोला तेढा शेत शिवारातील विहिरीत पडली अस्वल
By अंकुश गुंडावार | Published: September 5, 2022 03:07 PM2022-09-05T15:07:36+5:302022-09-05T15:09:18+5:30
विहिरीत पडलेल्या अस्वलला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.
गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील हल्बीटोला तेढा येथील शेतशिवारात ४ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास रामू खांडवाये यांच्या शेतशिवारात विहिरीत अस्वल पडली. ही घटना कळताच परिसरात खळबळ उडाली.
पाच सप्टेंबरला सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर भाजपचे काशिनाथ भेंडारकर यांनी गोंदिया जिल्हा आपत्ती निवारण समिती व वन विभाग गोरेगावला माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हा आपत्ती निवारण समिती व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
विहिरीत पडलेल्या अस्वलला मोठ्या शिताफिने बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली. विहिरीच्या बाहेर येताच अस्वलने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र शेतातच कुठेतरी अस्वल असल्याची भीती आता परिसरातील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे या परिसरात आता दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.