Gondia: कल्लू यादववर गोळीबार करणाऱ्या आरोपींची तुरूंगात रवानगी, मुख्य आरोपी फरारच
By नरेश रहिले | Published: January 22, 2024 06:52 PM2024-01-22T18:52:40+5:302024-01-22T18:53:01+5:30
Gondia Crime News: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४२, रा. बाराखोली, सिंधी कॉलनी, गोंदिया) यांच्यावर ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला.
- नरेश रहिले
गोंदिया - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४२, रा. बाराखोली, सिंधी कॉलनी, गोंदिया) यांच्यावर ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या नऊही आरोपींना न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्या आरोपींना आज (दि.२२) रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपींची भंडारा येथील तुरूंंगात रवानगी केली आहे.
या प्रकरणात १२ जानेवारी रोजी आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (२१) रा. भिंडी ले आऊट वरोडा ता. कळमेश्वर जि. नागपूर, अक्षय मधुकर मानकर (२८) रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलनी कळमेश्वर जि नागपूर, धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत (३२) रा. कुंभारेनगर गोंदिया व नागसेन बोधी मंतो (४१) रा. गौतमबुध्द वॉर्ड श्रीनगर गोंदिया यांना अटक केली होती. त्यानंतर १३ जानेवारीच्या रात्री ९:७ वाजता आरोपी शुभम विजय हुमने (२७) रा. भीमनगर गोंदिया व सुमित उर्फ पंछी विकास डोंगरे (२३) रा. कुंभारेनगर गोंदिया या दोघांना अटक करण्यात आली. १४ जानेवारी रोजी रोहित प्रेमलाल मेश्राम (३२, रा. कुंभारेनगर, गोंदिया) व १५ जानेवारी रोजी नितेश ऊर्फ मोनू लखनलाल कोडापे (२८, रा. विहीरगाव, तिरोडा- ह.मु. कुंभारेनगर, गोंदिया) व मयूर ऊर्फ सानू विजय रंगारी (२७, रा. सिंगलटोली, आंबेडकर वाॅर्ड, गोंदिया) यांना अटक करण्यात आली होती.
या सर्व आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठी सुनावली होती. सोमवारी पुन्हा पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी दुपारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने त्यांना भंडारा येथील तुरूंगात रवाना करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरारच असून त्याच्या मागावर गोंदिया शहर पोलिस व एलसीबीची चमू आहे.