गोंदिया आगाराला रिक्त पदांचे ग्रहण
By Admin | Published: July 7, 2016 02:00 AM2016-07-07T02:00:00+5:302016-07-07T02:00:00+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.
शेड्युल बदलले : मुख्य यांत्रिकाचे पदही भरले नाही
गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे बसफेऱ्यांच्या शेड्युलमध्ये वारंवार बदल करावे लागत आहे. एसटी महामंडळाने तातडीने रिक्त पदांची पूर्तता केल्यास गोंदिया आगाराच्या उत्पन्नात वाढ होवू शकते.
गोंदिया आगारात वाहकांची एकूण १७२ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या आगारात १२७ वाहक असून तब्बल ४५ वाहकांची पदे रिक्त आहेत. तर चालकांचीसुद्धा १७२ पदे मंजूर आहेत. मात्र १४५ चालक कार्यरत असून २७ चालकांची पदे रिक्त आहेत. तसेच यांत्रिकांची ५७ पदे मंजूर असून केवळ ४० यांत्रिक कार्यरत असून १७ यांत्रिकांची पदे रिक्तच आहेत. वाहक, चालक व यांत्रिक मिळून तब्बल ८९ पदे गोंदिया आगारात रिक्त आहेत.
विशेष म्हणजे मुख्य यांत्रिकाचे एक पद रिक्त आहे. मात्र इतर यांत्रिक कार्य सांभाळत असल्याने गोंदिया आगाराची बससेवा सुरू आहे. परंतु वाहकांची ४५ पदे व चालकांची २७ पदे रिक्त असल्याने चालक वाहकांच्या संख्येत मोठीच तफावत आहे. त्यामुळे वारंवार शेड्युलमध्ये बदल करावा लागतो. अशात वाहकाला दुसऱ्या शेड्युलमध्ये ओव्हरटाईम करावा लागतो. मात्र वाहकाने ओव्हरटाईमसाठी नकार दिला किंवा एखादा वाहक सुट्टीवर गेला तर तेवढ्या किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागतो.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या बसेसचा शेड्युल फिक्स असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात बदल होत नसून नियमित त्या बसेस धावतात. जवळपास सर्वच मार्गावर मानव विकासच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या विद्यार्थिनींचे पासेस बनविण्याचे कार्य सुरू आहे. काही मार्गावर विद्यार्थिनींच्या पासेस बनविण्यात आल्या नसल्याने व त्या मार्गावर विद्यार्थी संख्या पासअभावी किंवा शाळा बरोबर सुरू झाल्या नसल्याचे फेऱ्या रद्द करण्याची पाळी येते. गोंदिया आगारात दोन दिवसांतून एकदा डिझेलचा टँकर येत असल्याने डिझेलची कमतरता भासत नाही. मात्र वाहक व चालक यांच्या पदसंख्येत संतुलन नसल्यामुळेच गोंदिया आगाराच्या बसफेऱ्या वारंवार रद्द करण्याची समस्या उद्भवते. (प्रतिनिधी)