गोंदिया व तिरोडा आगाराचे हात रिकामेच; भंडाराला मिळाल्या ९ निमआराम बसेस 

By कपिल केकत | Published: July 20, 2023 07:31 PM2023-07-20T19:31:27+5:302023-07-20T19:31:34+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातील भंडारा आगारास ९ निमआराम-एशियाड बसेस प्राप्त झाल्या आहेत.

Gondia and Tiroda Agara's hands are empty Bhandara got 9 comfortable buses | गोंदिया व तिरोडा आगाराचे हात रिकामेच; भंडाराला मिळाल्या ९ निमआराम बसेस 

गोंदिया व तिरोडा आगाराचे हात रिकामेच; भंडाराला मिळाल्या ९ निमआराम बसेस 

googlenewsNext

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातील भंडारा आगारास ९ निमआराम-एशियाड बसेस प्राप्त झाल्या आहेत. बसेस नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. असे असतानाच मात्र जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगाराचे हात रिकामेच राहिले आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवनवे प्रयोग अंमलात आणले जात आहेत. मात्र, भंडारा विभागातील बहुतांश बसेसची वयोमर्यादा झाली असून, यामुळे प्रवाशांना प्रवासात त्रास होतो. 

यामुळे भंडारा विभागास नवीन बसेस मिळाव्यात याकरिता विभागाचे यंत्र अभियंता महेंद्र नेवारे यांनी सातत्याने मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठपुरावा केला हाेता. त्यांच्या प्रयत्नांचे फलित अखेर मिळाले असून, महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी मंगळवारी भंडारा विभागास ९ निमआराम बसेस देण्याबाबत आवश्यक आदेश निर्गमित केेले. भंडारा आगाराला मिळणाऱ्या ९ बसेसची बांधणी मध्यवर्ती कार्यशाळा दापाेडी-पुणे येथे करण्यात आली आहे. आकर्षक रंगसंगती व आरामदायी सीट असलेल्या बसेसची बांधणी माइल्ड स्टिल धातूने केली असल्याने मजबूत व सुरक्षित आहेत.

अतिरिक्त बसेस साेडण्याकरिता प्रवाशांकडून सातत्याने मागणी करण्यात येत हाेती. विभागात बसेसची कमतरता असल्याने आगार व्यवस्थापनास तारेवरची कसरत करावी लागत हाेती. नागपूर व लांब पल्ल्यावर साधारण ऐवजी निमआराम बसेस चालविण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थी व प्रवाशांकरिता अतिरिक्त साधारण बसेस चालविणे शक्य हाेणार आहे. विशेष म्हणजे, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना माेफत प्रवास व महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिल्याने एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ झालेली आहे. ९ बसेसमुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

तुमसरसाठी मिळणार १० नवीन निमआराम बसेस
नेवारे यांच्या प्रयत्नामुळे भंडारा आगाराला ९ नवीन निमआराम बसेस मिळाल्या आहेत. यानंतर आता तुमसर आगारासाठी त्यांनी १० बसेसची मागणी केली आहे. तुमसर आगार विभागातील महत्त्वाचे आगार असल्याने नवीन बसेस मिळणे अधिक लाभाचे ठरेल. अशात पुढील आठवड्यात नवीन बसेस मिळणार असल्याची शक्यता नेवारे यांनी वर्तविली आहे.

लोकप्रतिनिधींची उदासीनता जिल्ह्याला भोवली
भंडारा आगाराला बसेस मिळाल्या आहेत ही बाब चांगली आहे. मात्र, राज्यातील, अन्य जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी आपले संपर्क वापरून आपापल्या जिल्ह्यासाठी याहीपेक्षा जास्त बसेस खेचून घेतल्या आहेत. असे असतानाच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडाला रिकाम्या हातीच राहावे लागले आहे. गोंदिया जिल्हा दोन राज्यांना लागून आहे. शिवाय, आठ तालुके असल्याने गोंदिया व तिरोडा आगाराला नवीन बसेस मिळाल्यास त्यांचा कारभारही अधिक सुरळीत होणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

आगारातील बसेसची स्थिती

  • आगार - बसेस - एकूण
  • गोंदिया - ४ शिवशाही, २६ मानव विकास, ४० लालपरी -७२
  • तिरोडा- २ विठाई, ७ मानव विकास, ३३ लालपरी- ४२
     

Web Title: Gondia and Tiroda Agara's hands are empty Bhandara got 9 comfortable buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.