गोंदिया व तिरोडा आगाराच्या बसफेऱ्या रद्द
By admin | Published: July 23, 2014 11:41 PM2014-07-23T23:41:21+5:302014-07-23T23:41:21+5:30
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाली आहेत. काही रस्त्यांवरून गेलेल्या नदी-नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने एसटी महामंडळाची बससेवा प्रभावित झाली आहे.
पावसाचा फटका : नागरिकांची डोकेदुखी वाढली
गोंदिया: गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाली आहेत. काही रस्त्यांवरून गेलेल्या नदी-नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने एसटी महामंडळाची बससेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातून संचालित होणाऱ्या काही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती गोंदिया व तिरोडा आगार व्यवस्थापकांनी दिली आहे.
गोंदिया आगारातून मिळालेल्या माहितीनुसार, वाघनदीच्या पुलावर ८ फूटपर्यंत पाणी चढल्यामुळे गोंदिया-बालाघाट बससेवा बाधित झाली आहे. याशिवाय गोंदिया-देवरी मार्गावर डवकी नाला, गोंदिया-बोडूंदा मार्गावर बोरगाव नाला, गोंदिया-दवनीवाडा-तिरोडा मार्गावर अत्री नाला, गोंदिया-गल्लाटोला मार्गावर खडखडी नाला, गोंदिया-सालेकसा मार्गावर रोंढा नाला, गोंदिया-कामठा-आमगाव मार्गावरील किकरीपार नाल्यावर पाणी चढल्याने या मार्गावरील बस सेवा थांबविण्यात आली आहे. याशिवाय गोंदिया-घिवारी-चांदनीटोला आणि गोंदिया-हिरापूर मार्गावरील पुराडी गावाजवळ वृक्ष पडल्यामुळे मार्ग बंद आहे. २१ जुलै रोजी नाल्यांना पूर आले व रस्त्यांवर वृक्ष पडल्यामुळे जवळपास गोंदिया आगाराच्या ७० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तिरोडा आगारातून रजेगावमार्गे बालाघाटकडे होणाऱ्या एकूण ४० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या बसेस केवळ सातोनापर्यंतचा प्रवास करून परतत आहेत. तिरोड्यावरून चांदपूरकडे होणाऱ्या १० फेऱ्या (दि.२२) रद्द करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या केवळ बेलाटीपर्यंतच होणार असल्याची माहिती तिरोड्याचे आगार व्यवस्थापक एम.डी. नेवारे यांनी दिली. तसेच तिरोडा-खैरलांजी-वाराशिवनी-बालाघाट असा प्रवास करणाऱ्या बसेस खैरलांजीपुढील रस्ता अत्यंत खराब झाल्याने केवळ खैरलांजीपर्यंतच संचालित करण्यात आल्या आहेत. मलपुरी गावाजवळील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तिरोडा-गोरेगाव बस गावात प्रवेश न करता गावाबाहेरूनच आपला पुढील प्रवास करीत आहे. सरांडी ते केसलेवाडा रस्ता बंद असल्याने मानव विकास कार्यक्रमाच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिरोडा-गोंडमोहाळी-गोंदिया मार्गावर दवनीवाडा येथील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात किचड तयार होवून रस्ता खराब झाल्याने या मार्गावरील सहा फेऱ्या रद्द रद्द करण्यात आल्या. तिरोडा आगाराने दिलेल्या माहितीनुसार, विविध मार्गांवरील नाल्यांना पूर आल्यामुळे एकूण ४८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)