गोंदिया व वर्धा जिल्ह्याला वादळी पावसासह गारांनी झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:01 PM2020-03-14T12:01:36+5:302020-03-14T12:05:05+5:30
शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी गारपिटीने वर्धा व गोंदिया जिल्ह्यातील शेतपिकाची धूळधाण केली आहे. या वादळाची तीव्रता अधिक असल्याने शेतातील उभे पीक भुईसपाट झाले तर गारांमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/गोंदिया- शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी गारपिटीने वर्धा व गोंदिया जिल्ह्यातील शेतपिकाची धूळधाण केली आहे. या वादळाची तीव्रता अधिक असल्याने शेतातील उभे पीक भुईसपाट झाले तर गारांमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील गिरड येथे कोसळलेल्या पावसाने गहू व चणा हा माल जागीच फुटून जमीनदोस्त झाला आहे. गारांचा आकार मोठ्या लिंबाएवढा असल्याने लोकांच्या घरांवरील पत्रे, मोटारींच्या काचा व पक्ष्यांना त्याचा मोठा फटका बसला. आर्वी, भवानपूर, अंतरगाव, पिंपळगाव वडगाव या भागात ७० टक्के नुकसान झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे अतिवृष्टी झाली. येथे८९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या परिसरातील टरबूज, भेंडी, चवळी, मका, कारली या भाज्या जमीनदोस्त झाल्या आहेत. विजेचे खांब कोसळून विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. या सर्व नुकसानाची भरपाई शासन देईल काय याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.