Gondia: लाचखोर लेखापाल अडकला एसीबीच्या जाळ्यात, अडीच हजार रूपयांची लाच भोवली
By कपिल केकत | Published: August 1, 2024 07:51 PM2024-08-01T19:51:57+5:302024-08-01T19:52:55+5:30
Gondia Crime News: कंत्राटी आरोग्य सेविकेचा प्रोत्साहन भत्ता काढून दिल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करून दोन हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर कंत्राटी लेखापालास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
- कपिल केकत
गोंदिया - कंत्राटी आरोग्य सेविकेचा प्रोत्साहन भत्ता काढून दिल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करून दोन हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर कंत्राटी लेखापालास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गोरेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात गुरूवारी (दि.१) ही कारवाई करण्यात आली. सुरेश रामकिशोर शरणागत (३६,रा.चोपा) असे लाचखोर कंत्राटी लेखापालचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार महिला (३८,रा.मोहाडी,गोरेगाव) या चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गिधाडी येथील उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. लाचखोर सुरेश शरणागत याने त्यांचे प्रोत्साहन भत्ताचे १६ हजार ५०० रूपयांचे बिल काढून दिले असून त्याच्या मोबदल्यात तीन हजार रूपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गुरूवारी (दि.१) तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता पंचासमक्ष त्याने तीन हजार रूपयांची मागणी करून तडजोडी अंंती दोन हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दाखविली. यावर पथकाने सापळा लावून लाचखोर सुरेश शरणागत याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अतुल तवाडे, उमाकांत उगले, सहायक फौजदार करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, कैलास काटकर अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली आहे.